कधी कधी अगदी महत्त्वाच्या कॉलदरम्यान संवाद तुटतो, तोही पूर्ण नेटवर्क असतानाही. हा त्रास इतका वाढतो की लोक कंटाळून फोन बाजूला फेकतात किंवा नेटवर्क ऑपरेटरला दोष देतात. पण खरे पाहता, यामागे दोष नेटवर्कचा कमी आणि आपल्या फोनमधील काही सेटिंग्जचा अधिक असतो. थोडेसे लक्ष दिल्यास आणि योग्य मोड निवडल्यास ही समस्या काही मिनिटांत दूर होऊ शकते.

‘बॅटरी सेव्हर मोड’
बर्याचदा फोनमध्ये ‘बॅटरी सेव्हर मोड’ किंवा इतर बॅकग्राउंड सेटिंग्स चालू असतात. या मोड्समुळे बॅटरीची बचत होते खरी, पण त्याचा फटका फोनच्या परफॉर्मन्सवर आणि कॉल क्वालिटीवर बसतो. या सेटिंग्स मुळे आवाज अचानक कमी होतो, आवाज तुटक-तुटक येतो किंवा कॉलमध्ये खंड पडतो.
नेटवर्क कॅरियर सेटिंग्ज
तसेच, जर तुमचा फोन सतत 5G आणि 4G नेटवर्कमध्ये स्विच होत असेल, तर कॉल ड्रॉप होण्याची शक्यता वाढते. बऱ्याचदा आपण अशा भागात असतो जिथे 5G सिग्नल पुरेसा मजबूत नसतो, आणि फोन तो शोधत राहतो. अशावेळी, नेटवर्क कॅरियर सेटिंग्जमध्ये जाऊन 5Gऐवजी स्थिर 4G निवडल्यास कॉल अनुभव अधिक स्थिर होतो.
वाय-फाय कॉलिंग
वाय-फाय कॉलिंग हे दुसरे महत्त्वाचे कारण ठरू शकते. जर तुम्ही वाय-फाय कॉलिंग वापरत असाल, तर तुमच्या नेटवर्कचा वेग तपासावा. कारण खराब इंटरनेटमुळे देखील कॉलमधील आवाज तुटतो किंवा कॉल पूर्णपणे कट होतो.
याशिवाय, जर तुमचा फोन सॉफ्टवेअर अपडेटशिवाय चालत असेल, तर त्याचा परिणाम कॉल कनेक्टिव्हिटीवर होऊ शकतो. त्यामुळे ‘फोन सेटिंग्स’मध्ये जाऊन उपलब्ध असलेला अपडेट तपासा आणि इन्स्टॉल करा. प्रत्येक अपडेटमुळे तुमचा फोन अधिक स्मार्ट आणि कार्यक्षम बनतो.