उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देणारे जगदीप धनखड किती शिकले आहेत?, वाचा त्यांचा संपूर्ण प्रवास!

Published on -

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने देशभर खळबळ उडाली. आरोग्याचे कारण देत त्यांनी कलम 67 (अ) नुसार आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला. आता उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कधी आणि कशी होईल, याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर धनखड यांच्या एकूण कारकीर्दीबाबतही बोललं जातंय. या लेखात आपण त्यांच्या एकूण प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.

जगदीप धनखड यांचा प्रवास

जगदीप धनखड यांचा प्रवास राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील किथाना या छोट्याशा गावापासून सुरू झाला. 18 मे 1951 रोजी जन्मलेले धनखड लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. चित्तोडगडमधील सैनिक स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. नंतर जयपूर येथील राजस्थान विद्यापीठातील महाराजा कॉलेजमधून त्यांनी बीएससी ऑनर्सची पदवी घेतली. त्यानंतर 1978-79 मध्ये त्यांनी एलएलबी केलं आणि कायदाक्षेत्रात प्रवेश केला.

कायद्याच्या क्षेत्रात त्यांनी अतिशय सक्रिय भूमिका घेतली. 1979 मध्ये राजस्थान बार कौन्सिलमध्ये नोंदणी करून त्यांनी विविध उच्च न्यायालयांपासून ते थेट सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे हाताळली. त्यांच्या सखोल ज्ञानामुळे आणि प्रभावी मांडणीमुळे ते लवकरच या क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले.

राजकीय कारकीर्द

धनखड यांची राजकीय कारकीर्दही तितकीच रोचक आहे. त्यांनी जनता दलातून आपली सुरुवात केली. आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी लोकप्रतिनिधीची भूमिका पार पाडली. नंतरच्या काळात, 30 जुलै 2019 रोजी त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. आणि 11 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी भारताचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

 

सुमारे तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गंभीर चर्चांमध्ये संयम राखत, स्पष्ट मत मांडण्याचे कसब दाखवले. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे भारताचे उपराष्ट्रपती पद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. विशेष म्हणजे, कार्यकाळ पूर्ण होण्याआधी राजीनामा देणारे ते देशाचे तिसरे उपराष्ट्रपती ठरले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!