शिवमंदिरात पाय ठेवताच एक वेगळाच शांततेचा आणि श्रद्धेचा अनुभव मिळतो. तिथला धूपाचा मंद दरवळ आणि मंदिरातला घंटानाद मनात एक प्रसन्न भाव जागवतो. शिवमंदिरात जसे भोलेनाथ अग्रस्थानी असतात तसेच भाविक नंदीचे देखील दर्शन घेतात. खरे तर मंदिरात पाउल ठेवता क्षणीच आपण अगोदर नंदीचे दर्शन घेतो.

शिवाच्या मंदिरात प्रवेश करताच सर्वप्रथम आपल्या नजरेस पडतो तो नंदी, शांत बसलेला, पण भक्तांच्या प्रत्येक भावना आणि इच्छा काळजीपूर्वक ऐकणारा. त्याच्याशी बोलताना, भक्ताच्या मनात एक आशा असते की आपण जे बोललो ते थेट भोलेनाथांपर्यंत पोहचेल.
नंदीच्या उजव्या कानात सांगा इच्छा
हिंदू परंपरेनुसार नंदी फक्त वाहन नाही, तर तो एक संदेशवाहक आहे. नंदी आणि भगवान शिव यांचं नातं फारच गूढ आहे. पुराणकथांमध्ये असं सांगितलं जातं की नंदी हा शिवभक्तांचा आवाज ऐकून त्यांना साक्षात भगवान शिवांपर्यंत पोहचवतो. म्हणूनच अनेक भक्त मंदिरात येऊन थेट नंदीच्या कानात आपली इच्छा कुजबुजतात, जणू काही तोच देवाशी थेट संवाद साधण्याचा मार्ग आहे.
पण इथे एक महत्त्वाचं गुपित आहे. तुम्ही नंदीच्या कोणत्या कानात तुमची इच्छा सांगायची हे योग्य रीतीने समजणं आवश्यक आहे. श्रद्धेनुसार, नंदीच्या उजव्या कानात हलक्या आवाजात, पूर्ण भक्तीभावाने तुमची इच्छा सांगावी. डोकं थोडं झुकवून, मन एकाग्र करून, नंदीच्या उजव्या कानात हळूच आपल्या अंतःकरणातील भावना बोलाव्यात. या वेळी तुमच्या मनात कोणताही संदेह नको. श्रद्धा ही इथे सर्वात मोठी ताकद असते.
मनातील इच्छा कुणालाही सांगू नका
तुमचं बोलणं कुणालाही सांगायचं नसतं, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. ही गोष्ट नंदी महाराजांशी आणि भगवान शिवांशी असते, ती इतर कोणालाही माहिती व्हायची गरज नाही. तुमचं हे भक्तीपूर्ण गुपित केवळ त्या दिव्य शक्तीपर्यंत पोहोचावं, हीच यामागची भावना असते.
शेवटी, नंदीसमोरून जाताना एक क्षण थांबून तुमच्या बोललेल्या इच्छेसाठी कृतज्ञतेने नतमस्तक व्हा. त्याच्या डोळ्यांत पाहा आणि मनोमन विश्वास ठेवा की तुमची भावना, तुमची विनंती, नक्कीच ऐकली जाईल. श्रद्धा ठेवली, तर नंदी महाराज आणि भगवान शिव भक्तांच्या अंतःकरणातील हाक ओळखतात आणि योग्य वेळेस तिचं फळही देतात.