केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकवले पैसे, शेतकरी संघटनेकडून बेमुदत उपोषणाचा इशारा

Published on -

निंबेनांदूर- केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाचे एक रकमी व्याजासह पेमेंट तत्काळ अदा करावे अन्यथा दि.५ पाच ऑगस्टपासून शेवगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात संबंधित ऊस उत्पादकांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शेवगाव, गेवराई, पैठण या तालुक्यांसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यास गळितासाठी ऊस दिला. कारखान्याचा गळीत हंगाम संपून जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, काही ऊसउत्पादक शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या उसाचे पेमेंट मिळालेले नाही, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संबंधित ऊस उत्पादकांच्या बैठकीत कारखाना प्रशासनाने दि.१५ जुलैपर्यंत थकित पेमेंट अदा केले जाईल, असा शब्द दिला होता. मात्र, तारीख उलटूनही अजूनही थकीत पेमेंट मिळालेले नाही.

याबाबत कारखाना प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही झाली नाही तर दि. ५ ऑगस्टपासून शेवगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात संबंधित ऊस उत्पादकांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण पुकारण्याचा इशारा संघटनेच्या वतीने तहसीलदार आकाश दहाडदे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, रावसाहेब लवांड, बाळासाहेब फटांगडे यांच्यासह संभाजीनगर जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, मच्छिद्र आरले, संतोष गायकवाड, अमोल देवढे, संदीप मोटकर, अशोक भोसले, प्रशांत भराट, नानासाहेब कातकडे, नारायण पायघन, संजय नाचन, उस्मान सय्यद, भैय्याज शेख, जगदीश साळवे, भगवान रणमले, बालम शेख, रतन गजभिव, यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी, सदस्य व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!