अहिल्यानगर- सन २०२५- २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज दि. २३ जुलै रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली आहे.
नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींसाठी २३ जुलै रोजी दुपारी १२ वा. नियोजन भवन, जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली आहे. तसेच २३ जुलै रोजी दुपारी १ वाजता प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपूर्वी सरपंच आणि उपसरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले जाते. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका घेतल्या जातात. दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यावेळी सुटलेल्या आरक्षणानंतर अनेकांचा हिरमोडही झाला होता. काही जणांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणात बदल केला जाणार असून, राज्य शासनाने नव्याने आरक्षण जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्या तालुक्यात कोणत्या गावात महिला, सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण निघणार याचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने तयार करून मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांना पाठवला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या कार्यक्रमास मान्यता दिल्यानंतर आता नगर तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत ही २३ जुलै रोजी काढण्यात येणार आहे.