अकोले तालुक्यात सर्रासपणे होतेय दारू विक्री, पोलिस व उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

Published on -

अकोले- अकोले आणि राजूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली असून, अवैध दारू विक्री तात्काळ बंद न झाल्यास १५ ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अकोले तालुक्यातील २५ गावांमध्ये सर्रासपणे दारूविक्री सुरू आहे. संगमनेर, शेंडी, ठाणगाव येथून उघडपणे दारूची वाहतूक केली जाते. वीरगाव फाटा आणि इंदोरी फाटा या ठिकाणांवरूनही दारूची नियमितपणे ने-आण होते. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी यांनी आता तक्रारी करून थांबण्याऐवजी राजूर आणि अकोलेचे पोलीस अधिकारी तसेच उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात जाब विचारून त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याचे ठरवले आहे.

अन्यथा १५ ऑगस्टपासून उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी अकोले तालुका दारूबंदी समितीच्या बैठकीत तहसीलदार यांच्यासमोर दिला.

कुलकर्णी यांनी तालुक्यातील ज्या गावांमध्ये दारू विकली जाते, त्या सर्व गावांची यादी तहसीलदार यांच्यासमोर सादर केली व संबंधित बिट अंमलदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. संगमनेर येथून रोज रात्री दारूची वाहतूक करणाऱ्या गाड्या येतात, तरीही उत्पादनशुल्क विभाग त्यांना रोखत का नाही? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्या विभागातील अधिकारी या व्यवसायात सहभागी आहेत का, अशी शंकादेखील त्यांनी व्यक्त केली. याशिवाय अकोले परिसरात गुटखा विकणाऱ्या दुकानदारांकडून पकडल्यानंतर पैसे उकळल्याच्या प्रकाराचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी तहसीलदारांनी या तक्रारी अतिशय गंभीर असल्याचे सांगत पुढील आठ दिवसांत संबंधित गावांतील अवैध दारूविक्री थांबवण्याचे निर्देश दिले. तसेच संगमनेर येथून होणाऱ्या दारू वाहतुकीला तात्काळ आळा घालण्याचे आदेशही दिले. या बैठकीस अध्यक्षस्थानी तहसीलदार सिद्धार्थ मोरे होते. यावेळी अकोले पोलिस निरीक्षक बोरसे, राजूर पोलिस निरीक्षक सरोदे, उत्पादनशुल्क अधिकारी सहस्त्रबुद्धे, गटविकास अधिकारी अमर माने आणि अशासकीय सदस्य हेरंब कुलकर्णी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!