अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- शेतक-यांचा दबाव आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने मदतीचे फसवे पॅकेज जाहीर केले आहे. तीन तीन मंत्री असूनही जिल्ह्यातील शेतक-यांना नुकसानीची भरपाई मिळण्याची कोणतीही शाश्वत नाही.
सरकारी यंत्रनेकडून पंचनाम्यात झालेल्या हलगर्जीपणामुळे सरकारची बेफीकीरीच समोर आली असल्याची टिका भाजपाचे जेष्ठनेते माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा सहकारी बॅंकेच्या सभागृहात आ.विखे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे,
उपविभागीय कृषि आधिकारी सुधाकर शिंदे, जलसंपदा विभागाचे अभियंता सागर शिंदे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता थोरात, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, अॅड.रघुनाथ बोठे, सभापती सौ.नंदा तांबे, नगराध्यक्षा श्रीमती अर्चना कोते, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पिपाडा, उपसभापती ओमेश जपे, भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर,
तालुक्याचे सर्व आधिकारी, ग्रामसेवक तलाठी, कृषि सहाय्यक आणि शेतकरी उपस्थित होते. प्रारंभी आ.विखे पाटील यांनी सर्व विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. शेतक-यांनी प्रामुख्यांने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करताना झालेल्या गोंधळाची वस्तुस्थिती तक्रारीच्या रुपाने मांडली. फळबागांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे झाले नसल्याची गंभिर दखल घेवून फळबागांचे पंचनामे कृषि आणि महसुल विभागाने पुन्हा करावेत अशा सुचना आ.विखे पाटील यांनी दिल्या.
तालुक्यातील शेतशिवार रस्त्यांच्या संदर्भात दाखल झालेल्या प्रस्तावांच्या व्यतिरिक्त अन्य काही रस्त्यांच्या प्रश्नांबाबत ग्रामसेवक आणि तलाठी यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या समन्यवयातून प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. बैठकीत आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सडकुन टिका केली. अतिवृष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या गाड्या शेतक-यांनी अडविल्या, त्यामुळे दबावापोटी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने जाहीर केले.
यातून काय होणार असा सवाल उपस्थित करुन आ.विखे पाटील म्हणाले की, सरसकट पंचनामे करण्याकरीता ग्रामसभा बोलावून मुख्यमंत्रकडे मागणीचे ठराव करा. विमा कंपन्यांनी शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. विमा कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांचा नफा मिळविला. मात्र शेतक-यांच्या पदरात काहीच दिले नाही. हे सरकार शेतक-यांना त्यांच्या हक्काचे काही देणार नसेल तर न्यायालयात जावून मागण्या मान्य करुन घ्याव्या लागतील असा इशारा त्यांनी दिला.
दूध उत्पादक शेतक-यांचीही मंत्र्यांनी फसवणूक केली आहे. दूध भुकटीचे अनुदान मंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या संघानीच मिळविले. मात्र शेतक-यांना ठरल्याप्रमाणे प्रतिलिटर २५ रुपयांचा दर दिला नाही. अनुदानाचे पैसे गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित करुन, दूध भुकटी अनुदानाच्या गोंधळाबाबत येणा-या विधालसभा अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved