अहिल्यानगर : सुपा पोलिसांच्या ताब्यातील हितेशकुमार रवीश्वर प्रसाद या परप्रांतीय तरुणाचा मृत्यू मारहाणीमुळेच झाला असल्याचे शवविच्छेदनातून निष्पन्न झाले असल्याची खात्रीलायक माहिती आहे. दरम्यान या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवला आहे.
या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्याचे प्रभारी, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना तडकाफडकी नियंत्रण कक्षात हलवले आहे. शुक्रवारी (२५ जुलै) पहाटे तीन वाजता दिवटे यांना नियंत्रण कक्षात हजर होण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. दिवटे यांच्या जागी पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, गुरूवारी (२४ जुलै) मध्यरात्री १ वाजून २२ मिनिटांनी मयत हितेशकुमार व त्याच्या साथीदारांच्या विरोधात सुपे पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशवंत इंजिनिअरिंग या सिमेंट पाईप निर्मिती कंपनीचे मालक शरद आबा पवार यांनी,कंपनीत चोरीचा प्रयत्न झाल्याची फिर्याद दिली आहे.या फिर्यादीवरून मयत हितेशकुमार व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी मध्यरात्री सिमेंट पाईप कारखान्याच्या आवारात अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केल्याने या भागातील तरूण कारखान्याकडे धावले. त्यावेळी हितेशकुमार पीकअप घेऊन तेथून पुण्याच्या दिशेने निघाला मात्र सुपा टोलनाक्यावर अडवून तरुणांनी त्यास बेदम मारहाण केली होती. दरम्यान हितेशकुमारला पोलिस ठाण्यात बसवून सपोनि.दिवटे सिमेंट पाईप कारखान्याकडे गेले. दरम्यान, बुधवारी (२३ जुलै) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हितेशकुमार अत्यवस्थ झाला.
त्याला खासगी रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच तो मृत्यू पावला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान मृतदेह छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयाकडून मृत हितेशकुमारच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केल्याने मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.