अहिल्यानगर : जिल्ह्यात अकरावीच्या दुसऱ्या फेरीअखेर विविध कनिष्ठ महाविद्यालयात ३१ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी विविध शाखांत प्रवेश घेतले आहेत. यामध्ये कला, वाणिज्य शाखेपेक्षा तीनपट १९ हजार ६०५ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली. त्याखालोखाल ७ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी कला शाखेत, तर ४०२२ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतले.
प्रत्येक पालक आपल्या मुलाला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी आग्रह धरीत आहे.जिल्ह्याता १ जुलैपासून अकरावीच्या कॅप व कोटा प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. ७ जुलैपर्यंत अकरावीची प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली. दुसऱ्या फेरीची प्रवेश २१ जुलैपर्यंत झाले. जिल्ह्यात ४५६ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत.

यावर्षी दहावी उत्तीर्ण झालेले ६१ हजार ४१२ विद्यार्थी असून यातील अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी ५२ हजार २३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. जिल्ह्यात विविध तुकड्यांची प्रवेश क्षमता ८० हजार १६० आहे. नियमित फेरी एकमधील कॅप व कोटा अंतर्गत प्रवेश पूर्ण झाली. १ ते ७ जुलै दरम्यान २४ हजार ७१३ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला.
१० ते २१ जुलैपर्यंत दुसऱ्या फेरीचे ३१ हजार ४५३ प्रवेश झाले. यामध्ये १९ हजार ६०५ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत, ७ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी कला शाखेत, तर ४०२२ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतले. जिल्ह्यातील उच्च माध्यमिक विद्यालयात विविध शाखांच्या १०५७ तुकड्या मंजूर आहेत. यामध्ये कला शाखेच्या ३७४ तुकड्या, वाणिज्य शाखेच्या १६१, विज्ञान शाखेच्या ४८४, संयुक्त २९, व्होकेशनल शाखेच्या ९ शाखांचा समावेश आहे.