अहिल्यानगर : आजवर अनेकदा जिल्हा विभाजनाच्या बातम्या आल्या तसेच मुख्यालयावरून बरीच वादळे देखील उठली मात्र पुढे सर्व शांत झाले. आता महावितरणच्या अहिल्यानगर वीज मंडळाचे विभाजन करून आणखी एक मंडळ कार्यालय करण्याचा प्रस्ताव महावितरणच्या परिमंडळ कार्यालयाने वरिष्ठस्तरावर पाठविला आहे.
वीजग्राहकांची वाढती संख्या व जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार यामुळे महावितरणला ग्राहकसेवा देण्यात अडथळे येत आहेत.त्यामुळे महावितरणच्या अहिल्यानगर वीज मंडळाचे विभाजन करून आणखी एक मंडळ कार्यालय करण्याची मागणी केली आहे.वीज मंडळाचे विभाजन होऊन त्याचे कार्यालय नेमके कोठे होणार? याकडे शेतकरी, वीज ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

उत्तर जिल्ह्यातील नवीन वीज मंडळ कार्यालय श्रीरामपूर, बाभळेश्वर, शिर्डी, कोपरगाव येथेच व्हावे, यासाठी लोकप्रतिनिधींसह स्थानिकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यात महावितरणचा कारभार हाकण्यासाठी एक मंडळ कार्यालय आहे.अहिल्यानगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असून, शेतीप्रधान आहे. जिल्ह्यात शेतीपंप ग्राहकांची संख्या, बिगरशेती ग्राहकांची संख्या, उपकेंद्रांची संख्या, वाहिन्यांची संख्या तसेच रोहित्रे खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
त्यामुळे मंडळ कार्यालयाकडून त्या प्रमाणात त्याची निगा व देखभाल-दुरुस्ती यांचे नियंत्रण अपेक्षित आहे. भौगोलिकद्ृष्ट्या अहिल्यानगर मंडळ कार्यालयाचे मुख्यालय अहिल्यानगर आहे. जिल्ह्यातील काही कार्यालये ही मख्यालयापासून१०० ते १५० कि.मी. अंतरावर आहेत.
त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेवर नियंत्रण करणे कठीण होते. तसेच लोकप्रतिनिधींच्या वेळोवेळी झालेल्या आढावा बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येतात. परिणामी महावितरणबाबत जनमानसात रोष निर्माण होतो. त्यामुळे अहिल्यानगर मंडळाचे विभाजन करण्याची अनेक वर्षांपासूनची लोकप्रतिनिधी व जनतेची मागणी आहे.
त्यामुळे अहिल्यानगर मंडळ कार्यालयाच्या विभाजनाची निकड लक्षात घेता, विभाजन केल्यास कर्मचारी/अधिकारी यांना काम करत असलेल्या ठिकाणापासून मुख्यालयाचे अंतर कमी होईल आणि प्रत्येक ग्राहकाच्या समस्या सोडविणे सोयीचे होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून महावितरणच्या परिमंडळ कार्यालयाने मुख्य कार्यालयाकडे अहिल्यानगर मंडळ कार्यालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव पाठवला आहे.
आता मुख्य कार्यालयाने तातडीने या प्रस्तावास मंजुरी देऊन प्रत्यक्ष नवीन मंडळ कार्यालय लवकरात लवकर सुरू करावे, अशी वीजग्राहकांची मागणी आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात श्रीरामपूर व बाभळेश्वर ही दोन्ही ठिकाणे मध्यवर्ती असून, ग्राहकांच्याही सोयीची आहेत. त्यामुळे या दोन्हीपैकी एका ठिकाणी महावितरणचे नवीन मंडळ कार्यालय व्हावे, अशी काही वीज ग्राहकांची मागणी आहे. तसेच आमदार आशुतोष काळे यांनीही कोपरगाव किंवा शिर्डी येथे नवीन मंडळ कार्यालय व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.