आता स्कूल बसमध्ये देखील बसवावे लागतील सीसीटीव्ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचना

Published on -

अहिल्यानगर : सध्या सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना स्कूल बसने ये जा करावी लागते. मात्र या स्कूल बसमध्ये अनेक आवश्यक सुविधा उपलब्ध नसतात.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारी बस व वाहने सुरक्षित असावीत यासाठी प्रत्येक वाहनामध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या.

पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकतीच जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीची बैठक पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे बोलत होते. बैठकीस महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, चंद्रकांत खेमनर आदी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्हीची सुविधा कार्यान्वित करण्यात यावी. ६ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या ने-आणीसाठी बस किंवा वाहनांमध्ये महिला कर्मचारीची नियुक्ती करण्यात यावी. शालेय बस वा वाहनांवर अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांक स्पष्टपणे लिहावा. अवैध वाहतुकीविरोधात संबंधित विभागांनी संयुक्तपणे मोहीम राबवून दोषी वाहनांवर तातडीने कारवाई करावी.

विद्यार्थ्यांची चढ-उतार फक्त शाळेच्या पार्किंगमध्येच सुरक्षितपणे होईल, यासाठी सर्व बसेस तिथेच उभ्या कराव्यात. रस्त्यावर धोकादायक पद्धतीने चढ-उतार करू नये. प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापनाने जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी.अशा प्रकारच्या सूचना या वेळी त्यांनी केल्या. आता यातील किती स्कूल बस चालक अथवा शाळा व्यवस्थापन या सूचनांचे पालन करतात हे आगामी काळात दिसेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!