अहिल्यानगर : शिर्डी येथील ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ कंपनीने ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवूणक केली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे याला अटक केली. त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
त्याच्या चौकशीत कंपनीच्या ११ खात्यांवर ८६५ कोटींची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. असे अनेक मोठे धक्कादायक खुलासे झाल्याने तपासी अधिकाऱ्यांनी आणखी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २९ जुलैपर्यंत वाढ केली. राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

नाशिक, शाहादा (जि. नंदूरबार), शिर्डी आणि राहाता पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यासह साथीदारांवर गुन्हे दाखल आहेत. शिर्डी व राहाता येथील दाखल गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
कंपनीने सामान्य गुंतवणूकदारांना दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवून जाळ्यात ओढले आहे. राहाता येथील शितल गोरखनाथ पवार यांनी ४ जुलै रोजी राहाता पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भूपेंद्र सावळे याच्यासह भाऊसाहेब आनंदराव थोरात, संदीप सावळे, सुबोध सावळे व राजाराम भटू सावळे (सर्व रा. शिर्डी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने भूपेंद्र सावळे याला अटक केली. त्याला न्यायालयाने २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले.’ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीचे सुमारे ११ खाते असून, २०२२ पासून २०२५ पर्यंत त्या खात्यात सुमारे ८६५ कोटींचा व्यवहार झाल्याचे दिसून येते.
ते पैसे नेमके कोठे गेले याचा शोध घ्यावयाचा आहे. तसेच त्याने नाशिक येथे एक फायन्सास कंपनीकडे एक किलो २०० ग्रॅम सोन्याचे गोल्ड लोन केले आहे. त्याबाबतची तपास करावयाचा आहे. तसेच, त्याने इतकी मोठी रक्कम कोणाच्या खात्यावर वर्ग केली का अन्य कोठे गुंतवणूक केली याचा शोध घ्याचा असल्याने पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी तपासी अधिकाऱ्यांनी केली. न्यायालयाने त्याला २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.