अहिल्यानगर : ‘प्रधानमंत्री (पीएम) सूर्यघर मुफ्त वीज योजना’ अंतर्गत जिल्ह्यातील साडेसहा हजार नागरिकांनी घरावर सौर पॅनेल बसविले आहेत. यासाठी किलोवॅटनुसार केंद्र सरकार अनुदान देत आहे.
एका कुटुंबाला किमान ३०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळावी, यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

२०२४-२५ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी नागरिकांना त्यांच्या घरांवर सौर पॅनेल बसवण्यास मदत करण्याची योजना जाहीर केली. नंतर, पंतप्रधानांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त वीज योजना’ सुरू केली.
२०२४-२५ च्या अर्थसंकल्पात या योजनेवर लक्ष केंद्रित केले गेले. १ कोटी घरांवर सौर पॅनेल बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. घरांवर सौर पॅनेल बसवणाऱ्या आणि विजेसाठी सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना शासन अनुदान देत आहे.
यामुळे नागरिकांचा वीज बिलांवर होणारा खर्च वाचत आहे.
केंद्र सरकार नागरिकांच्या बँक खात्यात थेट अनुदान देत आहे. तसेच सौर पॅनेल बसविण्यासाठी सवलतीच्या दरात कर्जही उपलब्ध करून देत आहे.
दरमहा एका कुटुंबाला ३०० युनिट मोफत वीज पुरवण्याचे उद्दिष्ट या माध्यमातून शासनाने ठेवले आहे.
घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून आणि शाश्वत ऊर्जा पद्धतींचा अवलंब करून पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
३ किलोवॅट क्षमतेचे रूफ टॉप सोलर युनिट बसवून महिन्याला ३०० युनिट्सपर्यंत वीज वापरणाऱ्या घरासाठी वार्षिक अंदाजे १५ हजार रुपयांची बचत होते.
जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. अहिल्यानगर ग्रामीण ६२० लाभार्थी, अहिल्यानगर शहर विभाग २ हजार ८४६, कर्जत विभाग १९२, संगमनेर विभाग १८६४, श्रीरामपूर ग्रामीण विभाग् ९३३ अशा एकूण ६ हजार ४५५ लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेतला आहे.