शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची भुमिका ही केवळ वाढप्याची : आमदार दाते

Published on -

अहिल्यानगर : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना सातत्याने अडचणी येत असल्या तरी संबंधित लाभाच्या रकमा डिबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहेत. मात्र यामध्ये येणाऱ्या अडचणींची चौकशी ऑनलाईन पद्धतीने करावी लागते.

परीणामी लाभार्थ्यांची गैरसोय होत असल्याची जाणीव असुन त्यात लवकरच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले. पारनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आ.दाते म्हणाले की, शासन स्तरावर सर्वसामान्यांच्या हिताच्या विविध योजना राबविण्यात येत असुन, शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची भुमिका ही केवळ वाढप्याची भुमिका आहे. ती सर्वांनी योग्य व जबाबदारीने बजावत तालुक्यातील जास्तीत जास्त नागरीकांना लाभ सुलभतेने मिळवून देण्यात यावा.

या अभियानाच्या माध्यमातून पारनेर महसूल मंडलातील नागरिकांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती, मार्गदर्शन व थेट लाभ देण्याचे कार्य करण्यात आले. एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा आणि योजनांची सोय उपलब्ध करून दिली गेली होती. यामुळे सामान्य नागरिकांना अनेक योजनांचा लाभ मिळवणे अधिक सुलभ झाले.

यावेळी विविध योजनांसह शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेले विविध दाखले, परिवहन विभागाच्यावतीने शालेय विद्यार्थिनीना अहिल्याबाई होळकर लाभार्थी मोफत पास तर भूमी अभिलेख कार्यालयीन कामांसाठी मार्गदर्शन व उपस्थित लाभार्थ्यांना आमदार महोदयांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभाच्या पत्रांचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमातून पारनेर तालुक्यातील जनतेमध्ये शासकीय योजनांविषयी जागरूकता वाढली असून, नागरिकांचा शासनावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

सुशासनाच्या दिशेने एक गतिमान पाऊल ठरलेले हे शिबीर यशस्वी होण्यासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांनी विशेष प्रयत्न केले आणि स्थानिक पातळीवर शासन-जनतेत समन्वय घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

तहसील कार्यालयात विवीध रिक्त पदांवर नविन नियुक्त्या झाल्या असून उर्वरित जागांसाठी लवकरच आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाकडून वारंवार अपुऱ्या मनुष्यबळाची केली जाणारी तक्रार दुर होणार आहे. तालुक्यातील सर्वसामान्य नागरीक व विशेषत: महिलांच्या तक्रारी येणार नाहीत याची सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. असेही आमदार काशिनाथ दाते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!