शिर्डी येथील साईसच्चरित पारायण सोहळ्याला भक्तीमय वातावरणात प्रारंभ, हजारो भाविकांची उपस्थिती

Published on -

शिर्डी- येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, नाट्य रसिक मंच शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत श्री साईसच्चरित पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावाने सुरू झाला आहे. या पारायण सोहळ्यात सुमारे पाच हजारांहून अधिक महिला आणि दोन हजारांहून अधिक पुरुष अशा एकूण सात हजारांपेक्षा अधिक पारायणार्थीनी सहभाग घेतला.

याबाबत साईबाबा संस्थानच्या वतीने पत्रकात म्हटले, की या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सकाळी समाधी मंदिरातून श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची आणि श्रींच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक हनुमान मंदिर व द्वारकामाई मार्गे साईआश्रम भक्तनिवास येथील पारायण मंडपापर्यंत नेण्यात आली.

या मिरवणुकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी वीणा, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले व प्रमुख कामगार अधिकारी शरद डोखे यांनी श्रींची प्रतिमा तर मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांची सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांनी कलश घेऊन सहभाग घेतला.

यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात, नाट्य रसिक मंचाचे पदाधिकारी, मंदिर पुजारी, संस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत महिला पारायणार्थीना हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.

रात्री ७ते ९ या वेळेत श्रीसाईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ, प्राथमिक विद्यालय शिर्डी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम तर रात्री ७.३० ते ९.३० या वेळेत श्री लहू महाराज कराळे, निमगाव (श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर) यांचे किर्तन कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपात झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!