शहरातील मार्केट यार्ड परिसरात उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, मार्केट यार्ड चौकातील वाहतूकीत बदल

Published on -

अहिल्यानगर- शहरातील मार्केटयार्ड चौक येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व माळीवाडा वेस येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी चबुतरा उभारणे, परिसराचे सुशोभिकरणाचे भूमिपूजन २७ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या अनावरण सोहळ्यास खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार शिवाजीराव गर्जे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सचिव गोरक्ष लोखंडे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच, महाथेरो जगप्रसिद्ध भंते, विपश्यनाचार्य डॉ. राहुल बोधी, सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.

अहिल्यानगरवासियांनी, सर्व आंबेडकर प्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त संतोष टेंगले, विजयकुमार मुंडे, जलअभियंता परिमल निकम, शहर अभियंता मनोज पारखे, उपअभियंता श्रीकांत निंबाळकर, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती, महात्मा फुले पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मार्केटयार्ड चौकातील वाहतूक वळविली

महानगरपालिकेकडून मार्केटयार्ड चौक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मार्केटयार्ड येथील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. चांदणी चौक, मार्केट यार्ड चौक मार्गे पुणेकडे जाणारी सर्व वाहने कोठी चौक – महात्मा फुले चौक चाणक्य चौक – सक्कर चौकमार्गे जातील. तसेच, पुणेकडून सक्कर चौक- माळीवाडा मार्केटयार्डमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने सक्कर चौक चाणक्य चौक महात्मा फुले चौक कोठी चौकमार्गे जातील. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!