अहिल्यानगर- गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठपला आहे. गणेशोत्सवात गणेश मूर्तीचे विद्रुपीकरण व विटंबना होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. काही मूर्तिकार व सार्वजनिक गणेश मंडळे मूळ रूपातील गणपती सोडून काल्पनिक रूपातील गणेश मूर्ती स्थापन करत असतात. अशा काल्पनिक रूपातील गणेश मूर्त्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत.
त्यामुळे गणेश मूर्त्यांचे विद्रुपीकरण करणाऱ्या मंडळांवर व मूर्तिकारांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे राज्यपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केली.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रवीण गायकवाड, आयुश नागरे, ऋषिकेश थोरात, अर्जुन दळवी, अद्वैत पारगावकर आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले की, गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे. यावर्षी पासून गणेशोत्सव दरम्यान गणपती मंडळांनी जर मूळ रूपातील गणपती सोडून काल्पनिक रूपातील गणेश मूर्ती स्थापन केल्यास हिंदू धर्म देवी देवतांच्या विटंबना म्हणून त्या गणेश मंडळावर सक्तीची कारवाई करावी.
गणेश मंडळे व मूर्तीकार गणेश मूर्तीचे मूळ स्वरूप बाजूला ठेवून वेगवेगळ्या स्वरूपातील गणेश मूर्तीचील स्थापना करतात. ही बाब अत्यंत चुकीची असून, अशा प्रकारामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे अशा विद्रुपीकरणाला आळा घालावा व मूळ रूपातीलच गणपती बाप्पा मंडळांपर्यंत पोहोचवण्याचे कर्तव्य पार पाडावे. अन्यथा मनसे संबंधितांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.