Ahilyanagar Railway : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी अहिल्यानगर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे, कारण की अहिल्यानगर – पुणे थेट रेल्वे मार्ग विकसित करण्यात येणार असून पुणे जिल्ह्याला एकूण दोन रेल्वे मार्गांची भेट मिळणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव – चाकण – उरळी असे दोन रेल्वे मार्ग विकसित होणार अशी माहिती दिली आहे.

पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी या अनुषंगाने हे दोन रेल्वे मार्ग विकसित करण्यात येत असून यासंदर्भात पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सखोल चर्चा केली आहे. तसेच या दोन्ही प्रकल्पांच्या भूसंपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडून या दोन्ही प्रकल्पांच्या भूसंपादनाची कार्यवाही देखील सुरू करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून समोर आली आहे. दरम्यान आता आपण या दोन्ही रेल्वे प्रकल्पांबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कसा असणार पुणे – अहिल्यानगर थेट रेल्वे मार्ग?
पुणे – अहिल्यानगर रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या मार्गावर एकूण आठ स्थानके विकसित केली जाणार आहेत. हा मार्ग वढु बुद्रुक, शिक्रापूर मार्गे अहिल्यानगर पर्यंत जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यावरून कोरेगाव भीमा – शिक्रापूर – रांजणगाव – पिंपळनेर – अहिल्यानगर असा हा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. यामुळे रांजणगाव, सुपा, अहिल्यानगर या औद्योगिक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी आशा आहे. या प्रकल्पाचे काम पाच वर्षात पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.
तळेगाव – चाकण – उरळी रेल्वे प्रकल्प कसा असणार?
तळेगाव – चाकण – उरळी असा नवीन रेल्वे मार्ग विकसित करण्यात येणार असून या प्रकल्पानुसार तळेगाव – चाकण – वाघोली – उरुळी असा नवीन मार्ग तयार केला जाईल. या प्रकल्पाचे काम चार वर्षात पूर्ण होईल अशी माहिती समोर येत आहे.
या रेल्वे मार्गाची एकूण लांबी 75 किलोमीटर इतकी असेल. हा पूर्णपणे नवीन रेल्वे मार्ग राहणार आहे. हा रेल्वे मार्ग उरळी वरून सोलापूर – पुणे रोडवर जोडला जाईल.
याव्यतिरिक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उरळी येथे अडीचशे एकर जमिनीवर मेगा टर्मिनल विकसित होणार असल्याची माहिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प देखील पुण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.