कारमधून निघणारा धूर, रस्त्यांवर सतत फिरणारी वाहनं आणि त्या सगळ्यातून तयार होणारं सूक्ष्म कणांचं प्रदूषण हे केवळ डोळ्यांना किंवा फुफ्फुसांनाच नाही, तर थेट मेंदूवर हल्ला करतंय. आणि यामुळं डिमेंशियासारख्या गंभीर मानसिक आजाराचा धोका वाढतोय, असा खुलासा नुकत्याच एका संशोधनातून झाला आहे. डिमेंशिया हा एक असा आजार आहे जो स्मृती आणि मेंदूच्या कामकाजावर हळूहळू परिणाम करतो. आधी गोष्टी विसरायला होतं, मग चेहऱ्यांची ओळखही पुसली जाते. हे एकटेपणाचं एक अनोखं आणि वेदनादायक रूप आहे. पण आता संशोधन म्हणतंय की डिमेंशिया केवळ वृद्धापकाळाशी संबंधित नसून, आपल्या आजूबाजूच्या हवा किती स्वच्छ आहे, यावरही ते अवलंबून आहे.
नवीन संशोधनातून खुलासा
एका प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात जगभरातील 2.9 कोटी लोकांचा डेटा तपासण्यात आला. या संशोधनात 51 स्वतंत्र वैज्ञानिक अभ्यासांचा समावेश होता, आणि त्यातून एक बाब ठळकपणे समोर आली.वायू प्रदूषण आणि डिमेंशियामधला थेट संबंध. विशेषतः पीएम 2.5 नावाचे अतिशय सूक्ष्म कण, जे आपल्या नजरेला दिसतही नाहीत ते दर 10 मायक्रोग्राम वाढले की डिमेंशियाचा धोका तब्बल 17% ने वाढतो.
कारचा धूर, जळणाऱ्या लाकडाचा धूर या सगळ्यांमधून निर्माण होणारी काजळीही मेंदूला त्रासदायक ठरते. एका मायक्रोग्रॅम प्रमाणात वाढ झालं, तरीही 13% पर्यंत धोका वाढतो. मेंदूत जळजळ निर्माण होते, ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो आणि हाच ताण मेंदूच्या पेशींना हळूहळू नुकसान करतो.
तज्ञांनी काय म्हटले?
केंब्रिज विद्यापीठातील डॉ. ख्रिश्चन ब्रेडेल सांगतात की, केवळ औषधं देऊन डिमेंशियाचा मुकाबला शक्य नाही. यासाठी शहरांची रचना, वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरण धोरण यांचाही विचार करावा लागेल. म्हणजे, डिमेंशिया ही आता केवळ वैद्यकीय नाही, तर शहरी नियोजन आणि सामाजिक जबाबदारीची बाब झाली आहे.
डॉ. हनीन खरेस यांच्या मते, जर वायू प्रदूषण कमी करण्यात यश मिळालं, तर केवळ आरोग्य सुधारेल असं नाही, तर त्याचा आर्थिक आणि सामाजिक फायदा देखील होईल. रुग्णसंख्येत घट, आरोग्य सेवांवरील भार कमी होणं आणि कुटुंबांवरील मानसिक ओझं कमी होणं हे सगळं शक्य होईल.
व्हॅस्क्युलर डिमेंशियाचाही वाढला धोका
अध्ययनात आणखी एक गंभीर बाब समोर आली.व्हॅस्क्युलर डिमेंशिया, म्हणजे मेंदूमधील रक्तप्रवाहाच्या अडथळ्यामुळे होणाऱ्या प्रकारावर प्रदूषणाचा परिणाम अधिक तीव्र असतो. याचा अर्थ असा की, फक्त स्मृतीच नाही, तर संपूर्ण मेंदूची झपाट्याने होणारी अधोगती प्रदूषणामुळे घडू शकते.
हा संपूर्ण अभ्यास एक गोष्ट ठाम सांगतो, आपल्या शहरांमधील हवा केवळ धूळ आणि धूराने भरलेली नाही, तर ती आपल्या भविष्याला धीम्या गतीने कुरतडणारी आहे. स्वच्छ हवा ही आता केवळ एक पर्यावरणीय मुद्दा नाही, ती आपल्या मेंदूच्या आरोग्याची शिस्तीची गरज बनली आहे. त्यामुळे, वाहनांची संख्या, इंधनप्रकार, आणि शहरातल्या हरित पट्ट्यांचं प्रमाण या सगळ्याचा आता नव्याने विचार होणं अत्यावश्यक असल्याचं तज्ञ म्हणत आहेत.