नेवासा- शहरातील एकही पात्र लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिला. नेवासा नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीनंतर धनादेशाचे वाटप आमदार लंघे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
आ. लंघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर मुख्याधिकारी संतोष लांडगे, भाऊसाहेब वाघ, विजयाताई अंबाडे, डॉ. करण घुले, बाळासाहेब पवार, भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे, ऋषिकेश शेटे, अमृता नळकांडे, डॉ. निर्मला सांगळे, गणेश लंघे, अंकुश – काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. लंघे म्हणाले, ज्यांच्या नावावर जागा आहे त्यांना तर घरकुल मिळणारच आहे, पण ज्या लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली होती आणि बंदी कायद्यामुळे ते जागा खरेदी करू शकत नव्हते, त्यांच्यासाठीही अडथळा दूर झाला आहे. कारण आता तुकडेबंदीची अट शिथिल झाल्यामुळे जागा खरेदीस परवानगी मिळालेली आहे.
त्यामुळे ज्याच्या नावावर जागा नाही त्या लाभार्थ्यांना घरकुल बांधणे शक्य होणार आहे. नेवासा शहरातील मधमेश्वर नगर, गंगानगर, मारुती नगर या भागांतील लाभार्थ्यांचे घरकुल योजनेशी संबंधित प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असा विश्वासही आमदार लंघे यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात मुख्याधिकारी संतोष लांडगे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, नागरिकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा. सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केले तर आभार राहुल आढाव यांनी मानले.
नेवासा शहरासाठी प्रलंबित असलेल्या पाणी योजना संदर्भात उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री यांची अधिवेशन काळात भेट घेतली असून. लवकर या योजनेची प्रशासकीय मंजुरी होणार असल्याचे यावेळी आ. विठ्ठलराव लंघे यांनी सांगितले.