जेऊर- श्री संत शिरोमणी सावता महाराजांनी भक्ती, सामाजिक समता आणि प्रेमाचा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले आहे. जेऊर येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सवा बरोबर विविध कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी बोलताना अक्षय कर्डिले यांनी सांगितले की, संत सावता महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी ठरणारे आहे. संत सावता महाराज शेतकरी वर्गासाठी आणि सामान्य जनतेसाठी अध्यात्मिक प्रेरणा होते. त्यांनी आपल्या जीवनातून नामस्मरण, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक समतेचे मौल्यवान धडे दिले. ते आजही वारकरी संप्रदायाचे एक तेजस्वी दीपस्तंभ आहेत.

सावता महाराजांनी विठ्ठलाची अखंड भक्ती केली. नामजप, कीर्तन आणि सत्कर्म यांचा प्रचार केला. त्यांच्या अभंगातून भक्ती, सामाजिक समता आणि प्रेम यांचे संदेश दिले गेले आहेत. स्वतः शेतकरी असल्याने त्यांनी स्वतःचे शेतकाम आणि संतपण एकत्र केले. भक्ती आणि कर्तव्य यांचा सुंदर समन्वय साधला. संत सावता महाराजांनी इ.स. १२९५ च्या सुमारास पिंपळनेर या ठिकाणी समाधी घेतली. त्यांचे कार्य आजही जगाला प्रेरणादायी ठरत असल्याचे अक्षय कर्डिले यांनी सांगितले.
सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त जेऊर येथे वै. बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या आशीर्वादाने व हरिभाऊ महाराज भोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान ऋतुजाताई दळवी, भागवताचार्य राधिकाताई घुणे, अभिषेक महाराज उगले यांचेकीर्तन पार पडले. कृष्णा महाराज पुंड यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कीर्तन महोत्सवासाठी प्रकाश शास्त्री ढेपे, मच्छिद्र महाराज तवले, बाळकृष्ण महाराज केंद्रे, रघुनाथ महाराज तोडमल, रमेश महाराज चौधरी, धनंजय महाराज ससे, चांगदेव महाराज आठरे, सुदाम महाराज दारकुंडे, सावता माळी पतसंस्थेचे संस्थापक देवराम शिंदे, सोहम महाराज मगर, अर्जुन महाराज नवले, माऊली महाराज फटांगरे, अनिल महाराज गरुड, कृष्णा महाराज विधाते यांचे मार्गदर्शन लाभले. राहणार आहेत. संत सावता महाराज तरुण मंडळ व जेऊर ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.