संगमनेर- तिर्थक्षेत्र आणि निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून श्रीक्षेत्र निझर्णेश्वर देवस्थानच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले जात आहे. भाविक व पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता या परिसराचे आध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्रावण महिन्याच्या निमित्ताने ना. राधाकृष्ण विखे पाटील व शालिनीताई विखे पाटील यांनी निझर्णेश्वर येथे येऊन अभिषेक केला आणि दर्शन घेतले. या मंगलमय पर्वाच्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. देवस्थानच्या विश्वस्त समितीच्या वतीने मच्छिद्र थेटे यांनी त्यांचे स्वागत केले.

निझर्णेश्वर येथे श्रावण महिन्यातच नव्हे तर वर्षभर भाविक व पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देत आहेत. या परिसराचा विकास करताना निधीची अडचण येऊ दिली नाही. भविष्यात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वनतळा निर्माण करण्याच्या सूचना ना. विखे पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पाणी उपलब्ध झाल्यास परिसरातील वनराई अधिक समृद्ध होईल आणि निसर्ग पर्यटनास मोठी चालना मिळेल.
दूधेश्वर डोंगरावर वन विभागाने निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने आराखडा तयार करावा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. श्रावण महिन्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन परिसरात सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले. भाविकांना कोणतीही अडचण न येता दर्शन व पूजेसाठी सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.