श्रीरामपूर- आंबी येथून पुण्याला जाण्याकरिता पहाटे निघालेल्या मायलेकाच्या मोटरसायकलला बिबट्याची धडक बसल्यामुळे दोघेही जखमी झाले असून त्यांचेवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने दोघेही सुखरूप आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, आंबी येथील अलका भगवान वायदंडे (वय ४५) व त्यांचा मुलगा विशाल भगवान वायदंडे (वय २८) हे पुणे येथे जाण्याकरिता सकाळी साडेपाच वाजता आंबी येथून निघाले. श्री हरिहर केशव गोविंद बन या ठिकाणी रस्त्याच्या वळणावर गाडी असतानाच अचानक बिबट्याने गाडीला धडक दिली.

या धडकेमुळे बिबट्या देखील एका बाजूला पडला तर विशाल वायदंडे व अलका वायदंडे या एका बाजूला पडल्या. मात्र, बिबट्या लगेच शेजारील झुडपात निघून गेला. गाडीवरून पडल्यामुळे विशाल व अलका यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिबट्याची धडक बसून देखील दोघेही सुखरूप आहेत.