अहिल्यानगर : येथील अवनप्रितिसिंग गोधरा व सचिन प्रकाश काटे यांच्या मध्ये एक लाख विशिष्ट दर्जाचे एन-९५ मास्क पुरवठा करण्याचा करार झाला होता.या प्रकरणात आरोपीने ५३ लाख ९५ हजार ६४१ रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केला. या विरोधात गोधरा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अँड. अक्षय चौधरी यांच्यामार्फत फौजदारी अर्ज दाखल केला. न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.
फिर्यादी सचिन प्रकाश काटे व गोधरा यांच्यामध्ये १ कोटी ५३ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा करार झाला होता. त्यानुसार काटे यांनी आरोपीच्या खात्यात
७६ लाख ८० हजार ६५० रुपये जमा केले होते व त्या बदल्यात गोधरा यांनी १ लाख विशिष्ट दर्जाचे एन-९५ मास्कचा पुरवठा करायचा होता. परंतु कराराप्रमाणे १० दिवसांत आरोपीला सदर मालाचा पुरवठा वेळेत करता आला नाही. कारण मालाची मागणी मलेशियन कंपनीकडे दिली होती. ती कंपनीने पूर्ण केली नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी यांना २२ लाख ९५ हजार १०९ रुपये परत केले. परंतु बाकीचे पैसे मलेशियन कंपनीकडे अडकल्यामुळे आरोपीला फिर्यादीस देता आले नाही. म्हणून फिर्यादीने ५३ लाख ९५ हजार ६४१ रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला.

सादर गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र अहमदनगर मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले होते. फिर्यादीकडून ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. अँड. देशमुख यांनी अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. तर अँड. अक्षय चौधरी यांनी संबंधित वाद हा दिवाणी स्वरुपाचा असून, करारामध्ये भविष्यात वाद उद्भवल्यास तो लवादासमोर सामंजस्याने सोडवण्यात येईल. परंतु फिर्यादीने तसे न करता गुन्हा दाखल केला, असे निदर्शनास आणून दिले.त्यानंतर न्यायालयाने वरील निर्णय दिला.