फुटबॉलच्या मैदानावर जसा तो वेगाने धावतो, तसाच त्याचा प्रभाव डिजिटल दुनियेतही प्रचंड आहे. जगभरातील चाहते ज्याच्या प्रत्येक हालचालीकडे डोळे लावून बसलेले असतात, असा खेळाडू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो. केवळ गोल्ससाठीच नव्हे, तर त्याच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टमधून मिळणाऱ्या कमाईसाठीही तो चर्चेत असतो. आणि खरंच, या आकड्यांविषयी माहिती मिळाल्यावर तुम्हीही थक्क होणार, हे निश्चित!

वयाच्या जवळपास 40 व्या वर्षीही त्याचा जोश, तगडा फिटनेस आणि मैदानावरील आक्रमकता पाहून तरुण खेळाडूही प्रेरणा घेतात. पण मैदानाच्या बाहेरही त्याची ‘ब्रँड व्हॅल्यू’ प्रचंड मोठी आहे. इंस्टाग्रामवर त्याचे तब्बल 650 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ही संख्या इतकी अफाट आहे की, जगातील अनेक देशांच्या लोकसंख्येलाही मागे टाकणारी आहे.
एका पोस्टचे मानधन
या लोकप्रियतेचं भांडवल तो केवळ प्रेमासाठी नाही, तर व्यवसायासाठीही करतो. रोनाल्डो एका ब्रँडेड पेड पोस्टसाठी जवळपास 3.23 दशलक्ष डॉलर्स घेतो. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम जवळपास 27.94 कोटींच्या घरात जाते. एका फोटोमुळे इतकी कमाई , हे ऐकून कोणीही आश्चर्यचकित होईल. आणि ही केवळ एका पोस्टची किंमत आहे.
इंस्टाग्रामवर तो अतिशय सक्रिय असून त्याने आतापर्यंत 3,917 पोस्ट्स केल्या आहेत. रोनाल्डोचा हा डिजिटल प्रवास केवळ प्रसिद्धीचा नाही, तर कमाईचाही एक मोठा स्रोत आहे. ‘फोर्ब्स’च्या आकडेवारीनुसार, तो वर्षाला सुमारे 275 दशलक्ष डॉलर्स कमावतो. ही रक्कम भारतीय चलनात जवळपास 2,282.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. जाहिराती, ब्रँड डील्स, सोशल मीडियावरची उपस्थिती आणि फुटबॉल वेतन यांमधून त्याची ही अफाट कमाई होते.
एकूण संपत्ती
पण हे सगळं थोडक्यात मांडायचं झालं, तर ख्रिस्तियानो रोनाल्डो हा एक असा खेळाडू आहे जो मैदानातही विजय खेचतो आणि सोशल मीडियावरही टॉपवरच राहतो. त्याची एकूण संपत्ती आता 1 अब्ज डॉलर्सहूनही अधिक झाली आहे. आणि यामागे केवळ त्याचे खेळातील कौशल्य नाही, तर त्याची शिस्त, मेहनत, आणि स्वतःला एका ग्लोबल ब्रँडमध्ये रूपांतरित करण्याची दूरदृष्टी आहे.