घराच्या रोजच्या वापरातील गोष्टींमध्ये एक जरा लहानशी वाटणारी पण खूप डोकेदुखी ठरू शकणारी गोष्ट म्हणजे सिंकचा ड्रेन तुंबणे. तुम्ही भांडी घासत असाल, किंवा बाथरूममध्ये हात धुत असाल, आणि अचानक पाणी खाली न जाता वरती साचायला लागलं तर प्रचंड संताप होतो. अशावेळी पहिलं सुचतं ते म्हणजे प्लंबरला फोन करणं. पण यासाठी वेळ आणि पैसे, दोन्ही खर्च होतात. त्यापेक्षा काही सोपे आणि स्वस्त घरगुती उपाय तुमच्याकडेच उपलब्ध आहेत, ज्यांनी अनेक घरांमध्ये काम केलं आहे.

तुमचं सिंक तुंबलेलं आहे हे लक्षात येताच, सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्यापाण्याचा प्रवाह पूर्ण थांबलेला आहे की अजूनही काही प्रमाणात जातंय? जर पाणी थोडं थोडं खाली जात असेल, तर ही सुरुवातीची अवस्था आहे आणि लगेच लक्ष दिलं तर प्लंबरची गरजच भासणार नाही. पण जर पाणी अजिबात खाली जात नसेल, तर अधिक प्रयत्न करावे लागतील.
जाळी नीट तपा
सर्वप्रथम, सिंकमध्ये साचलेलं पाणी मग किंवा कपने काढून टाका. त्यानंतर, ड्रेनवर असलेली जाळी नीट तपासा. अनेकदा केस, अन्नाचे छोटे कण किंवा इतर घाण त्या भागात अडकून ड्रेन बंद होतो. ही जाळी नीट स्वच्छ केली तरी काही वेळेस पाण्याचा प्रवाह पूर्ववत होतो.
गरम पाणी वापरा
एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे गरम पाणी. एक-दोन लिटर पाणी उकळा आणि ते सावधपणे सिंकमध्ये ओता. तुम्ही हे दोन ते तीन वेळा करायला हरकत नाही. गरम पाणी ड्रेनमधील चिकट ग्रीस, साबणाचे थर किंवा इतर तेलकट पदार्थ वितळवून बाहेर टाकण्यास मदत करतं. पण जर तुमचं पाईपलाइन प्लास्टिकचं (PVC) असेल, तर फार उकळतं पाणी ओतू नका, त्यामुळे पाईपचे नुकसान होऊ शकते.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
जर फक्त पाणी काम करत नसेल, तर दुसरा भन्नाट उपाय आहे बेकिंग सोडा आणि व्हिनेगर. अर्धा कप बेकिंग सोडा थेट ड्रेनमध्ये ओता आणि लगेचच त्यावर अर्धा कप पांढरा व्हिनेगर टाका. यानंतर ड्रेनवर एक झाकण ठेवा किंवा जरा जाडसर कापडाने झाकून ठेवा. काही मिनिटांत फेस तयार होईल आणि तो फेस ड्रेनमधील घाण सोडवण्याचं काम करेल. 30 ते 60 मिनिटांनंतर हळूहळू गरम पाणी ओता, ड्रेन मोकळा झालेला असेल आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला असेल.
बेकिंग सोडा आणि मीठ
याशिवाय एक अजून परिणामकारक उपाय म्हणजे बेकिंग सोडा आणि मीठाचा वापर. अर्धा कप बेकिंग सोडा आणि 2 चमचे मीठ एकत्र करा, ते ड्रेनमध्ये ओता आणि लगेच त्यावर अर्धा कप व्हिनेगर ओता. साधारण 15-20 मिनिटं हे मिश्रण तसंच राहू द्या आणि नंतर भरपूर गरम पाणी ओता. हे मिश्रण ड्रेनमधील साचलेली चिकट घाण साफ करण्यात खूपच प्रभावी ठरतं.
हे उपाय अगदी सोपे आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंनी केलेले आहेत. त्यामुळे सिंक तुंबल्यावर घाबरू नका, प्लंबरला बोलावण्याआधी हे उपाय करून पहा. बऱ्याच वेळा हे घरगुती उपायच समस्येवर कायमचा तोडगा देतात.