संगमनेर तालुक्यात बेकायदेशीर सुरू असलेल्या कत्तलखान्यावर मध्यरात्री पोलिसांचा छापा, ५५० किलो गोमांस जप्त

Published on -

संगमनेर- तालुक्यातील कुरण गावात काटवाचा परिसर असलेल्या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर काल मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून सुमारे ५५० किलो गोमांस आणि इतर साहित्य जप्त केले. या कारवाईत १ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे गोमांस तसेच दुचाकी व हत्यारांसह एकूण २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी कुरण गावातील काटवाच्या परिसरातील बेकायदेशीर कत्तलखान्यावर अचानक धाड टाकली. कारवाईची चाहूल लागताच चार अज्ञात आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून बजाज सिटी हंड्रेड कंपनीची मोटारसायकल ३० हजार रुपये किमतीची आणि बजाज सिटी १०० कंपनीची मोटारसायकल ४० हजार रुपये किमतीची, एक लोखंडी सुरा, एक कुऱ्हाड असा मिळून २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

याप्रकरणी पोलीस नाईक रोहिदास शिरसाठ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्या आधारे पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ६७४/२०२५ प्रमाणे कलम २७१, ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९९५ व सुधारित अधिनियम २०१५ चे कलम ५ (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!