नेवासा- तालुक्यातील वाकडी येथील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातील मोफत रेशन गोण्या बदलून त्या धान्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. या घटनेमुळे वाकडी ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की बुधवार, २३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता वाकडी येथील सरकारी रेशन दुकानातून मोफत वाटपासाठी असलेल्या धान्याच्या गोण्या वाहनात भरल्या जात होत्या. मूळ गोण्यांतून धान्य काढून ते दुसऱ्या सामान्य गोण्यांत भरले जात असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत वाहनाला अडवले व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळवले.

त्यानंतर तत्काळ पुरवठा निरीक्षक, कामगार तलाठी आणि पोलीस यांना घटनास्थळी पाठवले. संबंधित वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये प्रत्येकी ५० किलो वजनाच्या २३ गोण्या तांदूळ व १३ गोण्या गहू असे एकूण ३६ गोण्या सापडल्या. पंचनामा करून सारा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धान्य वाहतूक ही काळ्या बाजारासाठीच असल्याचे स्पष्ट झाल्याने, नेवासा पोलिसांनी गोवर्धन काळे व बहिरनाथ वाघमुळे (दोघेही रा. दिघी, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.