श्रीरामपूर- काही दिवसांपूर्वी दोन वेळा कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे संशयीत आरोपी बेलापूर पोलिसांनी बेलापूर ते कान्हेगाव असा सिनेस्टाईल पाठलाग करून शिताफिने ताब्यात घेतले.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की बेलापूर येथील कोल्हार चौकातील इंडिया वन एटीएम दोन वेळा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. एका निळ्या रंगाच्या मारुती गाडीमध्ये आलेल्या काही इसमांनी हे एटीएम फोडण्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत होते. तसेच ती निळ्या रंगाची गाडीही स्पष्ट दिसत होती. दोन वेळा प्रयत्न असफल झाल्यानंतर आरोपींनी पुन्हा एकदा एटीएम फोडण्याचा प्लॅन बनविला.

त्याकरता ते पूर्ण गावाची पाहाणी करून बाजार तळाजवळ थांबले होते. ही बाब गावातील एका सुज्ञ नागरिकाने बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे यांना कळविली. लोखंडे तात्काळ बाजार तळावर गेले. त्या ठिकाणी निळ्या रंगाची मारुती ८०० ही गाडी उभी होती. गाडीतील
काचा बंद असल्यामुळे लोखंडे यांनी काचा वाजवून आतील इसमांना आवाज दिला; परंतु हे पोलीस आहेत हे ओळखल्यामुळे संबंधीत इसमांनी गाडी वेगाने काढली.
हे लक्षात येतात लोखंडे यांनी बेलापूर पोलीस स्टेशनला असलेले पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर यांना गाडीचा पाठलाग करण्यास सांगितले. घटनेची गांभीर्याता ओळखून तमनर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव तसेच हवालदार बाळासाहेब कोळपे यांना या घटनेबाबत माहिती दिली व त्या गाडीचा पाठलाग सुरू केला.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, हवालदार बाळासाहेब कोळपे, पंकज सानप यांनीही आरोपींचा पाठलाग सुरू केला. आरोपींनी गाडी पढेगावकडे वळवली. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. आरोपी पुढे पोलीस मागे अशी ती सिने स्टाईल शर्यत सुरू झाली. आरोपींची गाडी लाडगाव चौकीच्या मागे असताना त्यांना पुढे एक मिरवणूक आली.
त्यामुळे त्यांना गाडी हळू चालवावी लागली. याचा फायदा पोलिसांना मिळाला. पोलीस गाडीजवळ पोहोचणार तोच त्या गाडीने पुन्हा वेग वाढविला आणि लाडगाव कान्हेगाव चौकीजवळ वेगाने गाडी चालवत असताना आरोपींचा तोल गेला व गाडी एका खड्ड्यात जाऊन उलटली. तोपर्यंत पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी गाडीत असलेल्या तीनही आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडे बनावट पिस्तुल, दोरी, लोखंडी टॉमी, काळे गॉगल, काळे कपडे, मास्क असे साहित्य आढळून आले. गाडीतील तिन्ही जण जखमी झाले. त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले.