श्रीरामपूर- काल शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास काही विक्रेत्यांनी म्हाडा कॉलनीतील मोकळ्या रस्त्यावर चटया अंथरूण आपले सामान व भाजीपाला मांडण्यास सुरुवात केली. मात्र, जुन्या बाजातळावरही काही बाजारकरूंनी दुकाने थाटल्याची बातमी कानोकान झाल्याने या विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तर जुन्या बाजारतळावरही चलबिचल सुरू झाली. त्यातच म्हाडातील रहिवाशी असलेल्या काही
प्रतिष्ठीतांनी या बाजारकरूंना येथे दुकाने मांडू नका, असा विनंतीवजा इशारा दिला.
बाजारकरूंनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत ‘आम्हालाच येथे येण्याची इच्छा नाही, पण आमचा नाइलाज झाला आहे’, असे म्हणत नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, स्थानिक रहिवाशी व बाजारकरूंमध्ये चर्चा सुरू असतानाच काही स्थानिक माजी नगरसेवकांनी
तेथे येत बाजारकरूंसह स्थानिक रहिवाश्यांची मनधरणी केली. आम्ही तुम्हाला सर्व सोयी- सुविधा नजीकच्या काळात येथे उपलब्ध करून देतो, दुकाने येथेच राहू द्या, असे बाजारकरूंना सांगितले.
दुपारनंतरही व्यापारी व शेतकरी यांच्यामध्ये संभ्रम कायम असल्याने याठिकाणी फारसा उत्साह व प्रतिसाद दिसून आला नाही. याचवेळी नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी म्हाडामध्ये भेट देत तेथील रहिवाश्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तुमचे जे काही म्हणणे असेल ते लेखी स्वरुपात मुख्याधिकाऱ्यांना कळवा, त्यातून सकारात्मक मार्ग निघेल असे म्हणत माघारी फिरणे पसंत केले. दुपारी चार नंतर बाजार सुरू झाला असला तरी नेहमीपेक्षा आमचा माल कमी विकला गेल्याची प्रतिक्रिया अनेक विक्रेत्यांनी दिली.
रस्ता अद्याप पालिकेकडे हस्तांतरीत नाही
ज्या जागेवर सध्या बाजार भरविण्याचे नगरपालिकेने सांगितले तो रस्ता म्हाडाची मालमत्ता आहे. हा रस्ता अद्याप नगरपालिकेकडे हस्तांतरीत झालेला नसून, याबाबत चार महिन्यांपूर्वी प्रस्ताव देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने बाजार म्हाडाच्या मालमत्तेत कसा बसवला ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिकेने नेमके काय साध्य केले?
यापूर्वीचा बाजारही मोरगेवस्ती, संजीवनी हॉस्पिटल परिसर व इतर आसपासच्या रस्त्यांवर भरवला जात होता. नव्याने भरवलेला बाजारही रस्त्यावरच असल्याने यातून नगरपालिकेने काय साध्य केले? या प्रश्नाची उकल कुणालाही झालेली नाही; मात्र शहरातील आठवडे बाजारसाठी स्वतंत्र व स्वमालकीची जागा उपलब्ध करून तेथे बाजारतळ उभारणे हाच त्यावर एकमेव पर्याय आहे. तरच सामान्य नागरिकांची गैरसोय व बाजारकरूंची हेळसांड थांबेल.