आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडकणार, शिर्डीतील भाजप मेळाव्यात पालकमंत्री विखेंचे प्रतिपादन

Published on -

शिर्डी- देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठा जनाधार मिळत असून, कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपच यशस्वी ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत केले.

शिर्डी शहर भाजप मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप सोहळा मंत्री विखे पाटील
यांच्या उपस्थितीत झाला. शिर्डी शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, राज्य कार्यकारी परिषदेचे सदस्य राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, भाजप शहराध्यक्ष रविंद्र गोंदकर, ताराचंद कोते, योगेश गोंदकर, किरण बोऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ही जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेली संघटना आहे. या पक्षाला नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लाभले असून, भाजप हा सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे. संघटना मजबूत झाली तरच पक्ष जनतेच्या मनात स्थान मिळवू शकतो, हे त्यांनी स्पष्ट केले.

राममंदिराचे निर्माण, अंत्योदय चळवळीतून जनहिताच्या योजना आणि लोकाभिमुख निर्णय यामुळेच भारतीय जनता पक्ष सलग तीन वेळा केंद्रात सत्तेवर आला. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोकहिताचे निर्णय घेतले जात आहेत. जिल्ह्याच्या विकासालाही त्यांची भक्कम साथ लाभत आहे.

शिर्डीच्या विकासासाठी औद्योगिक वसाहत, पशुवैद्यकीय महाविद्यालय, विनातळाचे विस्तारीकरण, कुंभमेळा पार्श्वभूमीवर नव्या योजना, थिम पार्क आदींचा समावेश असलेला विकासाचा अजेंडा राबविण्याचे त्यांनी जाहीर केले.

हे सर्व प्रकल्प महायुती सरकारच्या पाठबळाने शक्य होणार असून, शिर्डी सुरक्षित ठेवण्यासाठी अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी गावपातळीवर कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात रविंद्र गोंदकर, अभय शेळके, कैलास कोते, नितीन दिनकर, राजेंद्र गोंदकर यांनीही आपली मते व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!