संगमनेर- तालुक्यात एमआयडीसी सुरू करावी, ही अनेक वर्षांपासूनची मागणी लवकरच प्रत्यक्षात उतरणार असून, संगमनेर तालुक्यात एमआयडीसी सुरू करणारच, असा ठाम आत्मविश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. एमआयडीसी सुरू झाल्यानंतर हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना आ. खताळ यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्द्यांवर भाष्य केले. संगमनेर तालुक्यात एमआयडीसी सुरू करण्यासाठी आपण उद्योगमंत्र्यांची प्राथमिक भेट घेतली असून, उद्योग मंत्री याबाबत सकारात्मक आणि अनुकूल आहेत, असे त्यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशनात आमदार खताळ यांनी गुंठेवारीसह विविध प्रश्नांवर लक्ष वेधले.

गुंठेवारी संदर्भातील प्रश्नावर शासनाने त्वरित निर्णय घेतला असून, याचा फायदा राज्यातील हजारो होणार नागरिकांना आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल आणि संगमनेर नगरपालिका व पंचायत समितीत महायुतीचे कार्यकर्ते पदावर दिसतील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
जागेचा अडथळा नाही
एमआयडीसीसाठी संगमनेर तालुक्यात जागा नाही, असे बोलले जात असले, तरी ती संकल्पना चुकीची असून, पर्याप्त जागा उपलब्ध आहे. त्यामुळे एमआयडीसीसाठी जागेचा अडथळा नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
संगमनेर जिल्हा मागणी प्राधान्य क्रमावर
जिल्हा विभाजनानंतर संगमनेर जिल्हा व्हावा यासाठी आपण आंदोलन केले असून, हा विषय अजूनही प्राधान्यक्रमात आहे. जिल्हा विभाजनाबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.