आपल्या आयुष्यात एक वळण असतं, जेव्हा आपण केवळ कमाईचं गणित करत नाही, तर बचतीचं शहाणपणही शिकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही वेळ म्हणजे निवृत्तीनंतरचा काळ, जिथं उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असतात, पण खर्चाचे आकडे अजूनही वाढतच असतात. या काळात, सरकारकडून मिळणाऱ्या कर सवलती हे केवळ फायदे नाहीत, तर एक प्रकारचा आधारही आहे, जे ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचं प्रतीक बनतं. म्हणूनच, तुम्ही जर 60 वर्षांहून अधिक वयाचे असाल, किंवा 80 ओलांडलेले अति-ज्येष्ठ नागरिक असाल, तर आयकर विवरणपत्र भरण्याआधी तुमच्या हक्कांच्या आणि सूट-सवलतींच्या बारकाव्यांना ओळखणं खूप महत्त्वाचं ठरतं.

आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख
सर्वप्रथम लक्षात घ्या, आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयकर रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. जर तुमचं वार्षिक उत्पन्न सरकारने निश्चित केलेल्या करमुक्त मर्यादेत येत असेल, आणि तरीही टीडीएस म्हणजेच टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स कापला गेला असेल, तर तो परत मिळवण्यासाठी आयटीआर भरणं आवश्यक ठरतं. अनेक ज्येष्ठ नागरिक हे करप्रणालीपासून अलिप्त राहतात, पण बँक व्याज, भाडे किंवा अन्य स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जातो हे त्यांना उशिरा उमगतं.
कर सूटचे नियम
60 वर्षांवरील नागरिकांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असतं, तर 80 वर्षांवरील अति-ज्येष्ठ नागरिकांना ही मर्यादा 5 लाख रुपये आहे. म्हणजे जर तुमचं वार्षिक उत्पन्न या मर्यादेच्या आत असेल आणि इतर कुठलाही टीडीएस वगैरे कापला गेला नसेल, तर तुम्हाला आयटीआर भरण्याची गरजच नाही. पण जर तुमचं उत्पन्न विविध स्रोतांतून येत असेल, जसं की भाडे, कर्जावर व्याज, शेअर्स इत्यादी तर मग रिटर्न भरावा लागतो.
2025 च्या अर्थसंकल्पात एक महत्त्वाचा बदल झाला. ज्येष्ठ नागरिकांना बँका आणि पोस्ट ऑफिसमधून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर सवलत 50,000 रुपयांवरून थेट 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, जर तुमचं वार्षिक व्याज उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर ते पूर्णपणे करमुक्त राहील.
आरोग्यासाठी डिडक्शन क्लेम
आरोग्य विमा किंवा जीवन विमा प्रीमियमही महाग झालेला काळ आहे, त्यामुळे त्यावरची डिडक्शही तितकीच महत्त्वाची. कलम 80D अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वैद्यकीय विम्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत डिडक्श मिळू शकते, ही मर्यादा इतर नागरिकांसाठी फक्त 25,000 रुपये आहे. शिवाय, गंभीर आजारांवरील उपचारांसाठी 80DDB अंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंत डिडक्श घेता येते, जे वयाच्या 60 खालच्या नागरिकांसाठी फक्त 40,000 रुपये आहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, व्याजावरची डिडक्श. बचत खातं किंवा फिक्स डिपॉझिटमधून मिळणाऱ्या व्याजावर ज्येष्ठ नागरिकांना 50,000 रुपयांपर्यंत डिडक्शचा लाभ मिळतो. हीच मर्यादा इतरांसाठी फक्त 10,000 रुपये आहे.
आगाऊ कर
आगाऊ कर म्हणजे वर्षभरात ठराविक टप्प्यांमध्ये दिला जाणारा कर. पण जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचं उत्पन्न व्यवसाय किंवा प्रॉफेशनमधून येत नसेल, आणि त्याची एकूण करदेयता 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तरीही कलम 207 अंतर्गत त्यांना आगाऊ कर भरण्याची गरज नसते. ही एक मोठी सवलत आहे, जी आर्थिक नियोजन सुलभ करते.
कधी कधी टेक्नॉलॉजीशी जुळवून घेणं कठीण जातं, विशेषतः वृद्धापकाळात. म्हणूनच अति-ज्येष्ठ नागरिकांना ITR-1 किंवा ITR-4 हे फॉर्म भरताना कागदोपत्री पद्धतीने रिटर्न भरायची मुभा देण्यात आली आहे. ई-फायलिंग त्यांच्यासाठी बंधनकारक नाही.
योग्य फॉर्म निवडा
पण फॉर्म निवडणं हा देखील एक महत्त्वाचा टप्पा असतो. जर उत्पन्न केवळ पेन्शन, भाडं, पगार किंवा इतर छोट्या स्वरूपात असेल, तर ITR-1 योग्य आहे. पण जर उत्पन्नात म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा अनेक घरांच्या मालकीची गणना येत असेल, तर ITR-2 निवडणं योग्य ठरतं. व्यवसाय किंवा प्रोफेशनमधून उत्पन्न असणाऱ्यांनी मात्र ITR-3 निवडावा.
ITR भरण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे. इनकम टॅक्स पोर्टलवर लॉगिन करून, योग्य फॉर्म निवडा, सर्व माहिती भरून सबमिट करा आणि आधार ओटीपीद्वारे व्हेरिफाय करा. एकदा का हे सर्व झालं, की मग तुमचा रिटर्न सुरक्षितपणे भरण्यात आला असं समजा.