Maharshtra Schools : गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी शाळांमधील पटसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे. अलीकडे पालकांचा जिथे जास्त फी ती शाळा चांगली असा समज तयार झाला आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालक लाखो रुपयांचा खर्च करतात.
आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे, आपल्या पाल्यांनी चांगले करिअर घडवावे यासाठी पालक अहोरात्र कष्ट करून, लाखो रुपयांची फी भरून आपल्या मुलांना शिकवतात. विशेषता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांमध्ये शिक्षणाचा खर्च अधिक वाढला आहे.

या महानगरांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र आज आपण देशाची आर्थिक राजधानी म्हणून ख्यातनाम असणाऱ्या मुंबईतील अशा शाळेची माहिती पाहणार आहोत जिथे एक रुपया डोनेशन न देता विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता येते.
विशेष म्हणजे एकीकडे सरकारी शाळांमध्ये शिक्षकांना पटसंख्या टिकवण्यासाठी अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर दुसरीकडे मुंबईमधील या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लॉटरी पद्धतीने ऍडमिशन द्यावे लागते.
ही आहे मोफत शिक्षण पुरवणारी शाळा
मुंबई महानगरपालिका च्या माध्यमातून मुंबईमधील शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे अनुषंगाने मुंबई पब्लिक स्कूल सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील विविध भागांमध्ये मुंबई पब्लिक स्कूलच्या शाळा आहेत. ही सरकारी शाळा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देत आहे कारण की या शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहेत.
मुंबईमधील या शाळा शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण प्रदान करण्यासाठी संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहेत. महत्वाची बाब अशी की या शाळांमधील शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. शिक्षण तर मोफतच आहे याशिवाय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, स्कूल बॅग, रेनकोट, आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य सुद्धा पूर्णपणे मोफत दिले जात आहे.
मुंबईतील या भागांमध्ये आहेत मुंबई पब्लिक स्कूल
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पब्लिक स्कूल चिक्कूवाडी, मिठागर, भवानी शंकर, अजीजबाग, जानकल्याण, कानेनगर, पूनम नगर, प्रतिक्षा नगर, राजावाडी, आणि वूलन मिल या भागात कार्यरत आहेत. मुंबई पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण दिले जाते सोबतच माध्यमिक शिक्षण सुद्धा दिले जाते.
म्हणजेच या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. या शाळांमध्ये मराठी हिंदी उर्दू गुजराती कन्नड आणि इंग्रजी या माध्यमांमधून शिक्षण दिले जात आहे. या शाळांमधील अभ्यासक्रम हा सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आला आहे.
या शाळांची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी जानेवारी महिन्यात सुरू होते. या शाळेमध्ये ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांना मुंबई महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा संबंधित शाळेत जाऊन अर्ज सादर करावा लागतो. मुंबई पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध आहेत.
शाळांची बिल्डिंग देखील फारच आधुनिक आणि आकर्षक बनवण्यात आली आहे. या शाळेत ऍडमिशन मिळालेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, नोटबुक्स, स्कूल बॅग, रेनकोट, गणवेश, आणि शूज दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. शाळांमध्ये खेळाचे मैदानही आहेत आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ सुद्धा शिकवले जातात. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेता येतो.