तिकीट बुकिंगपासून वेटिंगपर्यंत…रेल्वेने बदलले 4 मोठे नियम! आत्ताच जाणून घ्या, अन्यथा नुकसान तुमचंच

Published on -

भारतीय रेल्वे ही देशाच्या लाखो प्रवाशांच्या आयुष्याशी घट्ट जोडलेली एक जीवनवाहिनी आहे. ती पुन्हा एकदा आपल्या नियमांमध्ये मोठे बदल घेऊन आली आहे. हे बदल फक्त तांत्रिक नाहीत, तर रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या सामान्य माणसाच्या अनुभवावर थेट परिणाम करणारे आहेत. विशेष म्हणजे, हे नियम अनेकांना अजूनही माहिती नाहीत. त्यामुळे तुम्ही जर अजून या अपडेट्सकडे दुर्लक्ष केलं असेल, तर एखाद्या महत्त्वाच्या प्रवासादरम्यान तुम्हाला पश्चात्ताप करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपत्कालीन कोट्याबाबत नियम

सगळ्यात महत्त्वाचा आणि लक्षवेधी बदल म्हणजे आपत्कालीन कोट्याच्या तिकिटांबाबत. यापूर्वी, गरज भासल्यावर, प्रवासाच्या दिवशीच अर्ज करून आपत्कालीन कोट्यांतर्गत तिकीट मिळवता येत होतं. पण आता रेल्वे मंत्रालयाने नवा आदेश जारी करत स्पष्ट केलं आहे की, अशा तिकिटांसाठी अर्ज आधीच म्हणजे प्रवासाच्या एक दिवस आधी करावा लागेल. विशेषतः ज्या गाड्या रात्री 12:00 ते दुपारी 1:00 या वेळेत धावतात, त्यांच्यासाठी आपत्कालीन कोट्याचा अर्ज आधीच्या दिवशी दुपारी 1:00 वाजेपर्यंत सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आणि जर गाडी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी असेल, तर अर्ज कामकाजाच्या दिवशीच सादर करावा लागेल. याचा अर्थ असा की अचानक काही घडलं आणि शेवटच्या क्षणी तिकीट मिळवायचं ठरवलं, तर शक्यता खूपच कमी आहे.

रेल्वे चार्ट नियम

या बदलांबरोबरच रेल्वेने चार्ट तयार करण्याच्या नियमातही मोठा फेरबदल केला आहे. आधी जे काम फक्त चार तास आधी होत होतं, ते आता आठ तास आधी केलं जातं. यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळालं नाही, तरी वेळेत पर्यायी योजना आखण्याचा थोडाफार दिलासा मिळतो.

तत्काळ तिकीट बुकिंग

तत्काळ तिकीट बुकिंग करताना देखील आता एक नवीन अट लागू करण्यात आली आहे, ओटीपीसह आधार पडताळणी. म्हणजेच, जर तुमचं आधार कार्ड IRCTC खात्याशी लिंक नसेल, तर तत्काळ तिकीट बुक करणं अशक्य होईल. ही अट रेल्वेने फसवणूक थांबवण्यासाठी आणि अधिक पारदर्शकता आणण्यासाठी लावली आहे.

वेटिंग तिकिटांबाबत नियम

शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा बदल वेटिंग तिकिटांसह कोचमध्ये प्रवेश आता बंद करण्यात आला आहे. म्हणजे, जर तुमचं तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल आणि कन्फर्म नसेल, तर तुम्हाला स्लीपर किंवा एसी डब्यात बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. यामुळे तिकिटाशिवाय चोरून चढणाऱ्या आणि जागा अडवणाऱ्या प्रवाशांना अटकाव बसणार असला, तरी शेवटच्या क्षणी तिकीट मिळवण्याच्या आशेने वाट पाहणाऱ्यांना यातून मोठा फटका बसेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe