1999 सालच्या उन्हाळ्यात भारताच्या इतिहासातील एक अत्यंत भावनिक आणि शौर्यपूर्ण अध्याय लिहिला गेला, कारगिल युद्ध. हे फक्त एक लष्करी संघर्ष नव्हते, तर भारताच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि धैर्याचा निर्णायक प्रसंग होता. आजही त्या काळात घडलेल्या घटनांची आठवण काढली, की अंगावर शहारे येतात. पण या युद्धात भारताच्या विजयामागे फक्त आपले शूर सैनिकच नाहीत, तर काही जागतिक शक्तींचा मोलाचा पाठिंबाही होता. आणि काही राष्ट्रांनी पाकिस्तानशी हातमिळवणी करण्यापासून दूर राहणं हेही तितकंच महत्त्वाचं होतं.

सगळ्या गोष्टींचा प्रारंभ झाला तो मे 1999 मध्ये, जेव्हा पाकिस्तानी सैनिक आणि त्यांच्यासोबत लष्करी गणवेशात नसलेले दहशतवादी गट चोरपणे नियंत्रण रेषा ओलांडून कारगिलच्या उंच आणि बर्फाच्छादित भागात शिरले. त्यांनी तिथे बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला. या घुसखोरीमागचा उद्देश स्पष्ट होता, भारताच्या शस्त्रसंधीच्या नियोजनात अडथळा निर्माण करणे आणि सियाचीनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर ताबा मिळवणे. पण भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’च्या माध्यमातून केवळ या अतिक्रमणाचा सामना केला नाही, तर कठोर हवामानात, दगडधोंड्यांच्या दरम्यान, उंच शिखरांवर आपले संपूर्ण वर्चस्व पुन्हा मिळवले.
भारताला पाठिंबा देणारे देश
या संघर्षाच्या काळात भारत एकटाच नव्हता. अनेक आंतरराष्ट्रीय शक्तींनी भारताच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. अमेरिका, ज्याचा जागतिक राजकारणात महत्त्वाचा प्रभाव आहे, त्यांनी पाकिस्तानवर भारतीय हद्दीतील घुसखोरी थांबवण्याचा जोरदार दबाव टाकला. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना स्पष्ट शब्दांत सांगितले की नियंत्रण रेषेवरून तात्काळ सैन्य मागे घेणं आवश्यक आहे. याच वेळी त्यांनी भारताला देखील सार्वजनिक पाठिंबा जाहीर केला.
रशिया आणि इस्रायल हे भारताचे जुने मित्र या वेळीही मागे राहिले नाहीत. रशियाने भारताला लष्करी उपकरणं आणि राजनैतिक मदत केली. इस्रायलने तर कारगिलच्या कठीण भूप्रदेशात लक्ष्य साधण्यासाठी ड्रोन आणि अचूक क्षेपणास्त्रं पुरवली, ज्यामुळे भारताच्या हल्ल्यांची प्रभावीता अधिक वाढली.
पाकिस्तानला कुणी पाठिंबा दिला?
दुसरीकडे, पाकिस्तानला फारसा जागतिक पाठिंबा मिळाला नाही. जेव्हा संपूर्ण जग भारताच्या संयम आणि सामर्थ्याच्या बाजूने उभं होतं, तेव्हा पाकिस्तान एकटा पडलेला दिसत होता. चीन, जो पाकिस्तानचा जवळचा मित्र समजला जातो, त्यानेसुद्धा या वेळी थेट पाठिंबा देण्याचं टाळलं. त्यामागचं कारण स्पष्ट होतं, अणुयुद्धाचा धोका. चीनने युद्ध नको आणि संवाद हवा, अशा भूमिका घेत शांततेचा संदेश दिला.
26 जुलै 1999 रोजी भारताने कारगिल युद्धात निर्णायक विजय मिळवला. शेकडो जवानांच्या बलिदानातून मिळालेल्या या विजयाला आज आपण ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून दरवर्षी स्मरण करतो. तो फक्त एक दिवस नाही, तर राष्ट्रभक्तीचा, संघटनेचा आणि आपल्यातील अढळ आत्मविश्वासाचा प्रतीक आहे.