उत्तर प्रदेशात असलेलं एक असं शहर आहे, जे केवळ धार्मिक महत्त्वासाठी नव्हे, तर त्याच्या हजारो वर्षांच्या ऐतिहासिक वारशासाठी देखील प्रसिद्ध आहे. गंगाकाठी वसलेलं हे शहर म्हणजे वाराणसी. जिथे प्राचीनतेचा सुगंध आजही हवेत घोळतो आणि जिथे प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घाटावर इतिहास जिवंत वाटतो. वाराणसी हा केवळ एक जिल्हा नाही, तर संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचं जिवंत रूप आहे, ज्याची मुळे हजारो वर्षांपूर्वीच्या सभ्यतेत खोलवर रुजलेली आहेत.

वाराणसीचा इतिहास
इतिहासाचा मागोवा घेतला तर असं समजतं की वाराणसीचं अस्तित्व तब्बल 3,000 वर्षांपूर्वीपासून असल्याचं अनेक ऐतिहासिक व पुरातत्त्वीय पुरावे सूचित करतात. काही अभ्यासक तर याहून पुढे जाऊन म्हणतात की हे शहर 4,000 ते 5,000 वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे. जगात फार कमी शहरे आहेत, जी इतकी जुनी असूनही अजूनही अस्तित्वात आहेत आणि ज्यांचा सांस्कृतिक ठसा आजही तितकाच प्रभावी आहे.
आज जरी वाराणसी जिल्हा म्हणून ओळखला जात असला, तरी जिल्हा म्हणून याची अधिकृत स्थापना 24 मे 1956 रोजी झाली होती. 1965 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने राजपत्रात याचा उल्लेख केला. परंतु या शहराची खरी ओळख त्या तारखांनी नव्हे, तर हजारो वर्षांच्या संस्कृतीने जपलेली आहे. ‘वाराणसी’ हे नावदेखील दोन नद्यांवरून घेतलं गेलं आहे ‘वरुणा’ आणि ‘असी’. या दोन्ही नद्या गंगेच्या प्रवाहात मिसळतात, आणि त्या दरम्यान असलेल्या भूमीला ‘वाराणसी’ असं नाव प्राप्त झालं.
पौराणिक महत्व
हिंदू धर्मग्रंथांनुसार, भगवान शिव यांनी या शहराची स्थापना केली होती. त्यामुळेच वाराणसीला ‘शिवाची नगरी’ म्हणूनही ओळख दिली जाते. महाभारत, रामायण आणि विविध पुराणांमध्ये या नगरीचा उल्लेख ‘अविमुक्त’, ‘काशी’, ‘कासीपूर’, ‘जितवारी’ अशा अनेक नावांनी केला गेला आहे. विशेषतः राजा काश याने या भागाला राजधानी बनवल्यामुळे ‘काशी’ हे नाव अधिक प्रसिद्ध झालं.
आजच्या घडीला वाराणसी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 36,76,841 इतकी आहे. या लोकांमध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. एकीकडे संध्याकाळी गंगेच्या घाटांवर आरतीचा दिव्य अनुभव असतो, तर दुसरीकडे या जिल्ह्यात आधुनिक शिक्षणसंस्था, पर्यटन आणि व्यापारी व्यवहारांनीही चांगलीच प्रगती केलेली आहे.