आजकाल मुलांचे संगोपन हे फक्त चांगले शिक्षण, चांगली सवय आणि चांगला आहार यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. पालकांपुढे आता नवे आव्हान आहे, नव्या युगात जन्मलेल्या मुलांना समजून घेण्याचे. जेन- झी ला आपण नुकतेच ओळखायला सुरुवात केली होती, पण आता 2025 पासून सुरू होणारी ‘Gen Beta’ पिढी आपल्यासमोर आहे. ही पिढी फक्त डिजिटल नाही, तर भावनिकदृष्ट्याही अधिक जाणीव असलेली आहे. त्यांचा आत्मसन्मान, त्यांच्या भावना, त्यांच्या अभिव्यक्ती याबाबत सजग राहणं आता प्रत्येक पालकासाठी गरजेचं झालं आहे.

1997 ते 2012 मध्ये जन्मलेल्यांना जेन झी म्हटलं जातं, तर 2013 ते 2024 या काळात जन्मलेली पिढी म्हणजे जेन-अल्फा. पण आता, 2025 पासून जन्म घेणाऱ्या मुलांसाठी ‘Gen Beta’ हा नवा वर्ग ठरवला गेला आहे. हे केवळ नावापुरतं नवं नाही, तर या पिढीचं विचार करण्याचं, शिकण्याचं आणि प्रतिक्रिया देण्याचं तंत्रही वेगळं आहे.
तुलना टाळा
या नव्या जनरेशनच्या संगोपनात काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात. सर्वात आधी लक्षात ठेवा, या मुलांची कोणाशीही तुलना करू नका. ही पिढी तुलना सहन करत नाही आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. जर तुम्ही त्यांच्या क्षमतेचा योग्य आदर करत नसाल, तर ते तुमच्याशी मनापासून संवादही करणार नाहीत.
गुणांची स्तुती करा
याशिवाय, त्यांच्या चुका दाखवण्याऐवजी, त्यांच्या चांगल्या गुणांची स्तुती करा. जर काही कमतरता असतील, तर त्या प्रेमाने आणि मैत्रीपूर्ण भाषेत सांगितल्यास त्याचा चांगला परिणाम होतो. कारण ही पिढी ‘ऑथॉरिटी’पेक्षा ‘संपर्क आणि समजूत’ जास्त मानते.
जेन-बिटा पिढीसोबत वेळ घालवणं देखील खूप महत्वाचं आहे. आजची मुलं हे नेमकं ओळखतात की त्यांचे पालक त्यांच्यासाठी वेळ काढतात का नाही. त्यामुळे कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून त्यांच्यासोबत खेळणं, गप्पा मारणं हे त्यांना मानसिक आधार देतं.
मुलांशी मित्रांसारखं वागा
तसंच, पालकांनी आपली भूमिका ‘मित्रा’सारखी ठेवावी. फक्त शिकवण्यापेक्षा त्यांच्या भावना ऐकून घेणं आणि संवाद साधणं, ही नव्या पिढीची गरज आहे. तेच त्यांच्या विश्वासाचं बाळकडू ठरतं.
‘स्वाभिमान’
शेवटी, लहान वयातच त्यांना ‘स्वाभिमान’ म्हणजे काय हे समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून ते योग्य-अयोग्य यामधील सीमारेषा ओळखून व्यक्तिमत्त्व घडवू शकतील.