अवकाशाच्या अथांग पसरलेल्या गूढ दुनियेत भारताने आपल्या कार्यकुशलतेचा ठसा इतक्या ठळकपणे उमटवला आहे की, आता जग भारताकडे एक अंतराळ महासत्ता म्हणून पाहू लागले आहे. एकेकाळी केवळ काही यशस्वी प्रक्षेपणांपुरता मर्यादित असलेला भारताचा अवकाश प्रवास, आज आपल्या डोळ्यांदेखत एका भक्कम सामर्थ्यात रूपांतरित झालेला दिसतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने गेल्या काही दशकांमध्ये जे तांत्रिक कौशल्य दाखवले आहे, त्यामुळे आता आपणही ‘अंतराळातले खेळाडू’ म्हणले जातो.

भारताने आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 1975 मध्ये अंतराळात पाठवला होता, आणि आज जवळपास 5 दशकांनंतर, मे 2025 पर्यंत आपण तब्बल 127 उपग्रह यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवले आहेत. याचा अर्थ एवढाच की, आपण केवळ स्वप्न बघितली नाहीत, तर त्यांना वास्तवातही उतरवले आहे. इस्रोने सातत्याने विज्ञान, शिस्त आणि साधेपणाचा संगम साधत आपल्या प्रक्षेपण मोहीमांमध्ये खर्चही कमी ठेवला आणि परिणाम मात्र जागतिक दर्जाचे दिले.
भारताचे एकूण उपग्रह
आज इस्रोचे एकूण 61 उपग्रह पृथ्वीभोवती कार्यरत अवस्थेत फिरत आहेत. हे उपग्रह हवामान निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन, सीमांची हेरगिरी, नेव्हिगेशन, टेलिकम्युनिकेशन अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. कार्टोसॅट, रिसॅट, इनसॅट यांसारख्या महत्त्वाच्या उपग्रहांच्या सहाय्याने भारताने केवळ अंतर्गत सुरक्षाच मजबूत केली नाही, तर कृषी, जलव्यवस्थापन आणि शहरी नियोजनासारख्या क्षेत्रांमध्येही क्रांती घडवली आहे.
जगभरात सध्या 91 देश अंतराळाशी काही ना काही प्रकारे जोडले गेले आहेत. मात्र, केवळ 8 देशच असे आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचे उपग्रह प्रक्षेपण करण्याचे स्वतंत्र तंत्रज्ञान आहे. भारत हा त्या काही मोजक्या महासत्तांपैकी एक आहे, ही गोष्ट केवळ अभिमानाची नाही, तर भारताच्या वैज्ञानिक प्रगतीची स्पष्ट साक्ष आहे.
इतर देशांची यादी
उपग्रह चालवणाऱ्या देशांच्या यादीत भारत सध्या 6व्या क्रमांकावर आहे. अमेरिकेसारख्या महासत्तांपासून चीन, रशिया, फ्रान्स आणि जपान या देशांसोबत आता भारताचेही नाव खांद्याला खांदा लावून उभे आहे. आज भारताने अवकाशाच्या दिशेने सुरु केलेली ही वाटचाल, देशाच्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचे, योजनाबद्ध नियोजनाचे आणि जागतिक स्पर्धेमध्ये आपली छाप उमटवण्याच्या क्षमतेचे उदाहरण आहे.