डोराळे, कोराळे, वाळकी, गोरक्षवाडी आणि मोरवाडी या भागांत पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या गावांमध्ये पाणी येईल, असा विचार पूर्वी कोणीच केला नव्हता. मात्र आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सखोल नियोजनातून हा प्रश्न मार्गी लागला, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
गावागावांमध्ये पाणी पोहोचवण्याच्या कामाला अनेकांनी अशक्य मानलं होतं विरोधक, काही विचारवंत आणि अगदी हितचिंतकही. पण कार्यकर्त्यांच्या मेहनती आणि जनतेच्या विश्वासामुळे हे काम शक्य झालं. सातत्याने विरोधकांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर हे यश म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशक्तीचा विजय आहे, असेही ते म्हणाले.

राहाता तालुक्यातील मोरवाडी आणि संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी येथील बंदिस्त नलिका जलवितरण प्रकल्पांचे उद्घाटन पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाला कैलास नाना तांबे पाटील, मारुती पाटील, डॉ. सोमनाथ गोरे, शेटे साहेब, प्रकाश गोरे, संतोष गोरडे, मच्छू पाटील आणि निळवंडे प्रकल्पातील लाभार्थी शेतकरी तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. विखे पुढे म्हणाले, “निळवंडे लाभक्षेत्रातील कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत दिलेलं आश्वासन एका वर्षात ८०% पूर्ण केलं असून उर्वरित कामही लवकरच पूर्णत्वास नेलं जाईल.”
यावेळी त्यांनी एका खास अनुभवाचा उल्लेख करत सांगितलं, “डोराळे येथे जलपूजनाच्या वेळी दोन ज्येष्ठ नागरिक भेटले. त्यांनी सांगितलं की त्यांनी गेली १८ वर्षे आमच्या विरोधात मतदान केलं होतं, पण गावात पाणी येईल यावर विश्वास नव्हता. आज हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे ते आमच्या पाठीशी उभे राहण्याचं वचन देत आहेत. हा क्षण म्हणजे जनतेच्या मनोवृत्तीतील सकारात्मक बदलाचं प्रतीक आहे.”
गणेश कारखान्याच्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर विरोधकांनी आखलेली रणनीती लक्षात घेता, जनतेच्या पाठिंब्यामुळे आम्ही विधानसभेत ७० हजार मतांनी विजयी झालो, असे त्यांनी सांगितले. “आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर टिकून राहिलो, आणि आजही विरोधकांना सांगू इच्छितो विकासाच्या बाजूने रहा, आमच्यासोबत या,” असे आवाहनही त्यांनी केलं.
शेवटी, काही लोकांनी प्रचारासाठी बोगद्यात फोटोसेशन केलं, हेल्मेट घालून अभिनय केला, मात्र प्रत्यक्षात शाश्वत पाणीपुरवठा शक्य झाला तो नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खऱ्या प्रयत्नामुळेच, असे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.