कुकडी प्रकल्पात १६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा, विसापूर १०० टक्के भरले तर घोड धरणात ९२ टक्के पाणीसाठा

Published on -

अहिल्यानगर- यंदाच्या हंगामात शनिवारपर्यंत कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये १६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठा येत्या काही दिवसात वाढेल. कुकडीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा सुरवातीपासूनच पावसाचा चांगला जोर राहिला आहे. त्यामुळे धरणांतील डिंभे, येडगाव, वडज, पिंपळगाव जोगे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आवक झाली आहे. त्या तुलनेत माणिकडोह धरणातील पाणीसाठा कमी आहे.

यंदा अगदी मे महिन्यापासूनच कुकडीच्या लाभक्षेत्रात पावसाचे आगमन झाले. मात्र पाणलोट क्षेत्रात जून महिन्यानंतरच पाऊस सुरू झाला. त्यानंतर अधून मधून पाऊस सुरू राहिल्याने कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढतच राहिला. सध्या डिंभे धरणात एकूण ३३१.१९ दशलक्ष घनमीटर पाणी आहे.

त्यातील उपयुक्त पाणीसाठा ३०२.८९ दशलक्ष घनमीटर आहे. त्यापाठोपाठ माणिकडोह धरणात ११६. ५८ दशलक्ष घनमीटर एकूण पाणीसाठा असून ९६.६७ दलघमी उपयुक्त पाणी आहे. येडगाव धरणात ४२.८० दलघमी पाणी असून २८.६४ दलघमी उपयुक्त साठा आहे. पिंपळगाव जोगे धरणात १७५.८३ दलघमी पाणी असून ५०.६६ दलघमी उपयुक्त साठा आहे. वडज धरणात २४.५० दलघमी उपयुक्त पाणी आहे.

विसापूर धरणात २५.६२ दलघमी पाणी उपयुक्त आहे. घोड धरणातही १२७. ३८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पात एकूण पाणीसाठा ६९३. ४५ दलघमी आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा ४५२.५४ दलघमी आहे. म्हणजेच १६ टीएमसी पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पात समावेश असलेले माणिकडोह धरण बऱ्याचदा पूर्णक्षमतेने भरत नाही. त्यामुळे कुकडीत पाण्याची तूट कायम राहते. डिंभे धरण जवळपास दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरते. त्याचे पाणी नदी पात्रात गेल्यानंतर घोड धरणही तत्काळ भरते.

विसापूर शंभर टक्के, घोड धरण ९२ टक्के पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात भरणारे विसापूर धरण यंदा हंगामाच्या सुरवातीलाच शंभर टक्के भरले आहे. याशिवाय घोड धरणातही ९२ टक्के पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे या धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांना नियमाप्रमाणे आवर्तन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. घोड धरणातून श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील काही गावांच्या पाणी योजना आहे. त्यामुळे या गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. विसापूर धरणातील शेतकऱ्यांनाही आता कुकडीच्या पाण्याची वाट पहावी लागणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!