सध्या अनेक देशांमध्ये संघर्षाचे वारे वाहत असताना, काही देशांनी आपली लष्करी ताकद इतकी प्रचंड बनवली आहे की त्यांच्याकडे असलेली एकच गोष्ट शत्रूला थरथरवायला पुरेशी ठरते. ही गोष्ट म्हणजे “स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स” एक असे विध्वंसक हत्यार, जे आज संपूर्ण जगात केवळ तीन देशांकडेच आहे. या विमानांचं नाव जरी घेतलं तरी जगभरात भीतीचं सावट पसरतं.

काय आहे स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स?
आजकाल जगभरातील सामान्य नागरिकांनाही लष्करी ताकदीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशावेळी या बॉम्बर्सविषयी चर्चा होणं गरजेचं ठरतं. स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स म्हणजे काही साधं लढाऊ विमान नाही. ही विमानं आकाराने मोठी असतात, वजनदार असतात आणि शत्रूच्या सीमेत खोलवर घुसून अत्यंत मोठ्या प्रमाणात स्फोटकं किंवा अणुबॉम्ब टाकू शकतात. या विमानांचं खास वैशिष्ट्य म्हणजे, युद्ध सुरु झाल्यानंतरसुद्धा त्यांना परत बोलावणं शक्य असतं, त्यामुळे लष्करी डावपेचात त्यांचा वापर फार चतुराईने करता येतो.
शीतयुद्धाच्या काळापासून या विमानांकडे जगभरात सामर्थ्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. यांचा उद्देश केवळ हल्ला करणे नसतो, तर शत्रूला मनोवैज्ञानिक दडपणाखाली ठेवणं हा देखील एक मोठा उद्देश असतो. कारण एखाद्या देशाकडे जर हे अत्याधुनिक बॉम्बर्स असतील, तर कोणताही दुसरा देश त्याच्याशी पंगा घेण्याआधी हजार वेळा विचार करतो.
‘या’ देशांकडे आहेत स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स
आजच्या घडीला केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांकडे हे प्रचंड शक्तिशाली स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स आहेत. अमेरिकेकडे सर्वात जास्त म्हणजे 66 बॉम्बर्स असून, यात B-52, B-1 लान्सर आणि अत्याधुनिक B-2 स्पिरिट यांचा समावेश आहे. ही विमानं केवळ तांत्रिकदृष्ट्याच प्रगत नाहीत, तर युद्धकलेच्या दृष्टीनेही फार महत्त्वाची मानली जातात.
रशिया या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे सुमारे 60 सक्रिय स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स आहेत. यात सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी म्हणजे तुपोलेव्ह Tu-160 ज्याला जगातील सर्वात वेगवान आणि वजनदार बॉम्बर मानलं जातं.
चीनच्या बाबतीत बोलायचं झालं, तर सध्या त्यांच्या ताफ्यात सुमारे 20 H-6N बॉम्बर्स आहेत. ही विमानं मूळतः सोव्हिएत डिझाईनवर आधारित आहेत, मात्र आता चीन स्वतःचं अत्याधुनिक H-20 स्टेल्थ बॉम्बर विकसित करत आहे, जे त्यांच्या लष्करी क्षमतेला एक वेगळं वळण देऊ शकतं.
अशा विमानांची निर्मिती करणं म्हणजे तांत्रिक दृष्टिकोनातून अत्यंत गुंतागुंतीचं काम. त्यासाठी केवळ यंत्रसामग्री नव्हे, तर विशेष एअरफिल्ड्स, हवेत इंधन भरणारी विमाने, सॅटेलाइटवर आधारित नेव्हिगेशन आणि संवाद यंत्रणा यांचीही गरज असते. ही सगळी गोष्ट एका देशाकडून सहज शक्य होत नाही, म्हणूनच जगात फार थोड्या देशांकडे अशी ताकद आहे.