अहिल्यानगर- कोतवाली पोलिसांनी रविवारी (दि. २७) रात्री मार्केट यार्ड आनंदधाम परिसरात सुगंधीत तंबाख व गुटख्याची विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगणाऱ्या एकाला पकडले. त्याच्याकडून साधारण ९० हजारांची सुगंधीत तंबाखू व गुटख्यासह मोटारकार असा सुमारे तीन लाख ९९ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना २७ जुलै २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजता माहिती मिळाली की, आनंदधाम, मार्केटयार्ड परिसरात एका मोटारकारमध्ये एक व्यक्ती महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने स्वतः च्या कब्जात बाळगत आहे. त्यानुसार कोवताली पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक शीतल मुगडे यांनी पोलिस पथकासह मोटारकारचा शोध घेतला असता आनंदधाम येथील मार्केटयार्ड ते आनंदऋषीजी हॉस्पिटल रस्त्यावरील पॉलीटेक्नीक कॉलेजसमोर एक चारचाकी वाहन थांबविले.

तर, वाहन चालक मोटारकार घेऊन पळू लागला त्यास अडवून ताब्यात घेतले असता त्याने शरद अर्जुन पवार (वय ३०, रा. जाब, पो. कौडगाव, ता. जि. अहिल्यानगर) असे नाव सांगितले. त्याच्या मोटारकारची झडती घेतली असता साधारण ९० हजारांची सुगंधीत तंबाखू व गुटखा आढळून आला. गुटखा, मोबाईल व मोटारकार असा तीन लाख ९९ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ सुधाकर केकान यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक शीतल मुगडे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घागे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक शीतल मुगडे, गणेश देशमुख, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड, बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, सूर्यकांत डाके, योगेश कवाष्टे, राहुल शिंदे, अभय कदम, सत्यजित शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रेय कोतकर, संदीप कव्हळे, प्रतिभा नागरे, हिना बागवान, राहुल गुंडु यांच्या पथकाने केली.