अहिल्यानगर : नालेगाव येथे हिंदुत्व युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कुस्ती महोत्सवात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित राहून पैलवानांचे मनोबल उंचावले. विशेष म्हणजे, त्यांनी सन्मानाच्या मांडवात न बसता थेट मातीतील आखाड्यात जमिनीवर बसून कुस्तीचा रोमांच अनुभवला.
कार्यक्रमाच्या वेळी डॉ. विखे पाटील यांनी कुस्तीतील प्रत्येक डावपेच बारकाईने पाहत उपस्थितांची आणि पैलवानांची उत्स्फूर्तीने दाद दिली. त्यांच्या उपस्थितीने स्पर्धेला वेगळेच वजन प्राप्त झाले.

या वेळी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “ग्रामीण संस्कृती, मातीतली उमेद आणि गावकुसातील परंपरा हीच खरी भारताची ओळख आहे. अशा स्पर्धा नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या ठरतात.”
स्पर्धेमध्ये विविध वजनगटांतील दमदार सामने रंगले. अंतिम लढती पाहण्यासाठी आखाडा प्रेक्षकांनी फुलून गेला होता. विजेत्या पैलवानांचा यथोचित सत्कारही करण्यात आला.
या उपक्रमातून डॉ. सुजय विखे पाटील यांनी गावकुसातील मातीशी असलेली आपली नाळ अधोरेखित केली. त्यांनी कुठलाही राजकीय आडाखा न ठेवता, लोकसंस्कृतीशी सहज एकरूप होत, जनतेशी जवळीक साधली. अशा प्रतिनिधींमुळेच खऱ्या अर्थाने ‘जनतेचा नेता’ काय असतो, याची प्रचीती ग्रामीण जनतेला आली.