आजची तरुण पिढी आर्थिकदृष्ट्या अधिक सजग होत आहे. केवळ बचत करून भविष्य सुरक्षित करता येणार नाही, हे आता सगळ्यांनाच समजले आहे. म्हणूनच लोक आता अधिक परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंडांकडे वळत आहेत. मात्र, म्युच्युअल फंडांच्या विविध प्रकारांमुळे अनेक वेळा गुंतवणूकदार गोंधळून जातात. मल्टी-कॅप की फ्लेक्सी-कॅप, दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर दोघांपैकी कोणता पर्याय जास्त फायद्याचा ठरेल, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

म्युच्युअल फंड हा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा एक सुजाण मार्ग आहे. यामध्ये विविध प्रकारांचे फंड्स असतात. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप आणि फ्लेक्सी कॅप. त्यात गुंतवणूक करताना प्रत्येकाने आपल्या गरजा, जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि परताव्याची अपेक्षा यांचा विचार करून योग्य फंड निवडावा लागतो.
मल्टी-कॅप फंड म्हणजे?
मल्टी-कॅप फंड म्हणजे असा फंड जो प्रत्येक प्रकारच्या कंपन्यांमध्ये समसमान गुंतवणूक करतो. 25% लार्ज कॅप, 25% मिड कॅप, 25% स्मॉल कॅप, आणि उर्वरित 25% फंड मॅनेजरच्या धोरणावर आधारित असतो. त्यामुळे गुंतवणुकीचं संतुलन ठेवलं जातं आणि बाजारातील चढ-उतारांच्या जोखमीपासून काही प्रमाणात संरक्षण मिळतं.
फ्लेक्सी-कॅप फंड म्हणजे?
तर फ्लेक्सी-कॅप फंडमध्ये फंड मॅनेजर पूर्ण स्वातंत्र्यानं निर्णय घेतो. बाजाराच्या स्थितीनुसार त्याला वाटेल तसं. कधी लार्ज कॅपमध्ये, कधी स्मॉल कॅपमध्ये किंवा केवळ मिड कॅपमध्ये पैसे गुंतवण्याचं स्वातंत्र्य असतं. याचा फायदा म्हणजे जिथे संधी दिसेल, तिथे गुंतवणूक शक्य होते. पण यामध्ये फंड मॅनेजरच्या निर्णयक्षमतेवर संपूर्ण अवलंबून राहावं लागतं.
फायद्याचा फंड कोणता?
AMFI च्या आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात मल्टी-कॅप फंड्सनी जवळपास 44.11% परतावा दिला आहे, तर फ्लेक्सी-कॅप फंड्सचा परतावा 43.13% च्या आसपास आहे. हे आकडे सांगतात की दोघांचाही परतावा जवळपास सारखाच आहे, मात्र त्यांची धोरणं आणि रचना वेगळी आहे. त्यामुळे, परतावा केवळ आकड्यांवरून ठरत नाही. गुंतवणुकीची सुरुवात करण्यापूर्वी तुमचं ध्येय, तुमची जोखीम सहन करण्याची क्षमता आणि बाजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे अधिक महत्त्वाचं ठरतं.
जर तुम्हाला जोखीम संतुलित ठेवायची असेल आणि प्रत्येक प्रकारच्या कंपन्यांमध्ये काही प्रमाणात गुंतवणूक हवी असेल, तर मल्टी-कॅप फंड तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. पण तुम्हाला बाजाराची दिशा आणि ट्रेंड लक्षात घेऊन अधिक फायद्याची संधी शोधण्याचं स्वातंत्र्य फंड मॅनेजरला द्यायचं असेल, तर फ्लेक्सी-कॅप फंड योग्य ठरेल.
SIP
दुसरीकडे SIP म्हणजे शिस्तबद्ध गुंतवणुकीचा एक सुंदर मार्ग. मात्र, जर कधी SIP चुकली, तर फंड कंपन्या दंड आकारत नाहीत. पण बँका तुमच्या खात्यात पैसे नसल्यास ₹150 ते ₹750 पर्यंत दंड लावू शकतात. त्यामुळे SIP कापली जाण्याच्या दिवशी खात्यात पुरेसे पैसे असतील याची खात्री करणे आवश्यक आहे. सलग तीन वेळा हप्ते चुकवल्यास SIP आपोआप बंद होऊ शकते.
शेवटी, फंड कोणताही असो गुंतवणूक नेहमी समजून, शिस्तबद्ध आणि दीर्घकाळासाठी करावी. कारण संपत्ती एका रात्रीत निर्माण होत नाही, पण योग्य नियोजन आणि संयम ठेवला तर ती निश्चितच उभी राहू शकते.