राहुरी- शासन दरबारी गेली ४४ वर्षे प्रलंबित असलेली श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी आणि देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका निर्मितीचा सामाजिक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करून या मागण्यांकडे लक्ष वेधले.
राजेंद्र लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले, की अहिल्यानगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे गोवा आणि दिल्ली राज्यापेक्षा मोठे आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनावर ताण निर्माण होतो. यावर उपाय म्हणून, शासनाने श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती तातडीने करावी, अशी मागणी त्यांनी केली. श्रीरामपूर जिल्हा झाल्यास बहुतांश कार्यालये निकषांच्या आधारे शहरात कार्यरत होणार असून, यामुळे स्थानिक लोकांना विविध सुविधा सहज उपलब्ध होतील. ही निर्मिती सर्वसामान्य जनतेच्या हिताची ठरेल, असे लांडगे यांनी स्पष्ट केले.

राजेंद्र लांडगे यांनी यावेळी सांगितले की, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राहुरी तालुक्यातील दुर्लक्षित ३२ गावे येतात. या गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या देवळाली श्रीशिवाजीनगर परिसराचा स्वतंत्र तालुका करण्यात यावा. राजेंद्र लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ही विनंती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य अजित कदम, भास्कर कोळसे, प्रा. अरविंद सांगळे, शामकांत खडके, महेश औटी, अनिस पठाण, योगेश सिनारे, मयूर कदम, संतोष धनवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आश्वासन दिल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.