अहिल्यानगर- हिंदुत्व युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने शहरातील नालेगाव येथे आयोजित भव्य जंगी निकाली कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन मल्लांचा उत्साह वाढवत आखाड्यात बसून कुस्तीचा थरार अनुभवला. कुस्तीतील प्रत्येक डावपेच त्यांनी बारकाईने पाहत पैलवानांना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले.
हिंदुत्व युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी नालेगाव येथे जंगी निकाली कुस्त्यांचा आखाडा भरविला जातो. यंदा माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते अंतिम कुस्ती लावण्यात आली. यावेळी अहिल्यानगर महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “गावकुसातील परंपरा, मातीतली ताकद व ग्रामीण संस्कृतीच खरी भारताची ओळख आहे. अशा कुस्ती महोत्सवातून तरुणाईला प्रेरणा मिळते.” कुस्ती स्पर्धेमध्ये विविध वजनगटांतील अनेक चुरशीच्या लढती रंगल्या.
अंतिम टप्प्यातील सामने पाहण्यासाठी संपूर्ण आखाडा हाऊसफुल्ल झाला होता. विजेत्या पैलवानांचा सन्मानही या वेळी करण्यात आला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामसंस्कृतीशी असलेली आपली नाळ दाखवत, राजकीय गाजावाजा न करता सरळ मातीशी एकरूप होण्याचा आदर्श घालून दिला.