भारतातील रेल्वे स्थानकांची भव्यता आणि विविधता जगभरात प्रसिद्ध आहे. पण याच पार्श्वभूमीवर जर आपण पाकिस्तानातील रेल्वे व्यवस्थेकडे पाहिलं, तर तिथेही इतिहास, सांस्कृतिक संदर्भ आणि सुविधा यांचं एक वेगळंच मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. या लेखातून आपण पाकिस्तानातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे, त्याची वैशिष्ट्यं काय आहेत आणि ते भारतातील हावडा जंक्शनच्या तुलनेत कितपत मोठं किंवा लहान आहे, हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

पाकिस्तानचं रेल्वे नेटवर्क जगात 22 व्या क्रमांकावर असून, दरवर्षी जवळपास 6.5 कोटी प्रवासी या व्यवस्थेमार्फत प्रवास करतात. एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेल्या या देशात रेल्वेची पायाभरणी अगदी ऐतिहासिक काळात झाली. याच प्रवासात लाहोर रेल्वे स्थानकाचा उल्लेख विशेष महत्त्वाचा ठरतो.
लाहोर रेल्वे स्थानक
लाहोर हे पाकिस्तानातील सर्वात मोठं आणि ऐतिहासिक रेल्वे स्थानक मानलं जातं. हे स्टेशन 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर बांधण्यात आलं. स्थापनेपासून ते आजतागायत याने अनेक ऐतिहासिक टप्पे पार केले. 1947 मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात या स्थानकाने दंगलींचं आणि मोठ्या प्रमाणात स्थलांतराचं साक्षीदारपणही अनुभवलं. एकेकाळी ‘गुरु अमरदास रेल्वे स्टेशन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी आज एकूण 7 प्लॅटफॉर्म आणि 11 ट्रॅक आहेत, ज्यामुळे ते पाकिस्तानमधील सर्वात मोठं स्टेशन मानलं जातं.
याठिकाणी प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. वेटिंग हॉल, रिफ्रेशमेंट स्टॉल्स आणि स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधा इथे असल्या तरी हायटेक सुविधा मात्र तुलनेनं कमी आहेत. तिथल्या व्यवस्थापनाचं केंद्रबिंदू अजूनही पारंपरिक रेल्वे सेवेवर आहे.
भारताचे हावडा जंक्शन
पण जर आपण हाच संदर्भ भारतातील सर्वात मोठं स्टेशन असलेल्या हावडा जंक्शनशी लावून पाहिला, तर फरक स्पष्ट जाणवतो. हावडा स्टेशनवर एकूण 23 प्लॅटफॉर्म आहेत, जे लाहोरच्या 7 प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत सुमारे तीनपट जास्त आहेत. केवळ प्लॅटफॉर्मच नव्हे, तर प्रवाशांची संख्या, सुविधा आणि रोजचं वाहतूक प्रमाण हावडाला पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या स्थानकाच्या तुलनेत अनेक पटींनी मोठं बनवतं.
या दोन्ही स्टेशनांचा इतिहास आणि स्थानिक महत्त्व जरी स्वतंत्र असलं, तरी त्यातून दोन्ही देशांचा सांस्कृतिक वारसा आणि रेल्वे व्यवस्थेचा प्रवास समजून घेणं अत्यंत रोचक ठरतं. लाहोर स्टेशन पाकिस्तानच्या इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे, तर हावडा जंक्शन भारताच्या प्रगतीचं आणि आधुनिकतेचं प्रतीक मानलं जातं.