कोपरगाव- स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत येथील बस स्थानकाचे परीक्षण राज्य परिवहन महामंडळाचे नागपूर प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी आदमाने, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड, महेश देशपांडे यांनी नुकतेच केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या सहा अ वर्ग बसस्थानकांचे परीक्षण सोमवारपासून सुरु झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यात कोपरगाव, श्रीरामपूर, नाशिक येथील बस स्थानकांचे परीक्षण ही समिती करणार आहे. याप्रसंगी आगारप्रमुख अमोल बनकर यांनी स्वागत केले. तर स्थानक प्रमुख योगेश दिघे, वाहतूक निरीक्षक गिरीश खेळणार, वाहतूक नियंत्रक पांडुरंग वहाडणे, आशिष कांबळे, हिरामण दराने,
वरिष्ठ लिपिक विशाल गुंजाळ, औदुंबर श्रीगादी चालक, वाहक, कर्मचारी उपस्थित होते.

एसटी महामंडळाने २०२३-२४ पासून स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक स्पर्धात्मक अभियान सुरु केले. यंदा अभियानाचे दुसरे वर्ष सुरु असून अ वर्ग बसस्थानकांचे परीक्षण २३ जुलैपासून सुरु झाले आहे. अ वर्ग बसस्थानकात तारकपूर, वाहक माळीवाडा व स्वस्तिक तसेच श्रीरामपूर, कोपरगाव आणि संगमनेर या सहा बसस्थानकांचा समावेश आहे.
परीक्षण समितीचे प्रमुख तथा नागपूर प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांच्या नेतृत्वाखाली सांख्यिकी अधिकारी किशोर आदमाने, महेश देशपांडे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड, विभागीय अधिकारी चंद्रकांत चौधरी या परीक्षण समितीने याआधी तारकपूर, माळीवाडा व स्वस्तिक बस स्थानकांस भेट देत प्रत्यक्ष निरीक्षण केले.
या समितीने बस स्थानकाची स्वच्छता, चालक, वाहक, कर्मचारी निवास व्यवस्थेची पाहणी, स्वच्छता गृहे, बस स्थानक परिसर, बस स्थानकांचा आवार, फलाट, बगीचा, स्वच्छतेची व्यवस्था, कार्यालय, स्वच्छतागृह, चालक वाहक यांच्या निवासाची व्यवस्था, वाहतूक नियंत्रण कक्ष, उद्घोषणाची यंत्रणा, बस स्थानकातील विविध मार्गावरील फेऱ्यांचे सूचना फलक आदींची पाहणी केली.