शिर्डी- स्पेशल ऑलिंपिक भारत या संघटनेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने पुणे येथील बालकल्याण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जलतरण व पॉवर लिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धेत राज्यभरातील दिव्यांग खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. अहिल्यानगर येथील शाखेच्या पाच खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवत दोन खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
स्विमिंग स्पर्धेत बाबू याने ५० मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि १०० मीटर फ्री
स्टाईल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. दीपक कांतीलाल पावरा याने ५० मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून राष्ट्रीय पातळीवरील स्थान निश्चित केले आहे. पॉवर लिफ्टिंग प्रकारात रज्जाक गोच्चू याने स्कॉट ४० किलोग्रॅम, बेंच प्रेस ४० किलोग्रॅम, आणि डेड लिफ्ट ९५ किलोग्रॅम वजन उचलून उत्कृष्ट कामगिरी केली. कृष्णा याने स्कॉट ४० किलोग्रॅम, बेंच प्रेस ३५ किलोग्रॅम, डेड लिफ्ट ८० किलोग्रॅम, तर अभिजित माने याने स्कॉट २० किलोग्रॅम, बेंच प्रेस २० किलोग्रॅम, आणि डेड लिफ्ट ३५ किलोग्रॅम वजन उचलून यशस्वी सहभाग नोंदवला.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण विखे पाटील स्पोर्ट्स अकॅडमी विळदघाट येथे क्रीडा संचालक डॉ. किरण आहेर आणि प्रभारी विक्रांत येवले यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. प्रा. संदीप राहाणे, दत्तात्रय कोलते आणि हर्षल वाणी या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी कौशल्यविकासासाठी मेहनत घेतली. हे सर्व खेळाडू जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.
जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना देश व जागतिक स्तरावर नावलौकिक मिळावा, या हेतूने रणरागीणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्पेशल ऑलिंपिक भारताच्या अहिल्यानगर शाखेची स्थापना करण्यात आली आहे. या खेळाडूंना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन तर्फे प्रशिक्षण दिले जात असून, विखे पाटील भौतिक उपचार महाविद्यालयाच्या तज्ज्ञांकडून शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायाम व उपचारांची सुविधा देण्यात आली आहे.